देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्माती कंपनी हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. आपल्यापैकी बहुतांश लोक याच कंपनीची बाईक किंवा स्कुटर वापरतात. नुकतेच हिरो मोटोकॉर्पने आपल्या जून महिन्यातील विक्रीबद्दल माहिती दिली आहे. या माहितीनुसार कंपनीने जून महिन्यात एकूण 4 लाख 36 हजार 993 गाड्यांची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हिरो कंपनीने 4 लाख 84 हजार 867 गाड्यांची विक्री केली होती. या तुलनेने वार्षिक आधारावर वाहनांच्या विक्रीत 9.9 टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. तसेच कंपनीची देशांतर्गत विक्री देखील कमी झाली आहे. यामुळे हिरोच्या देशांतर्गत बाजारातील हिस्सा जून महिन्यात वार्षिक आधारावर कमी झाला आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
हिरोच्या दुचाकी वाहनांच्या विक्रीत 12.34 टक्क्यांची घट
हिरोच्या देशांतर्गत बाजारातील दुचाकीच्या विक्रीत घट झाल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने 4 लाख 61 हजार 421 वाहनांची विक्री केली होती. ज्यामध्ये यावर्षी 12.34 टक्क्यांची घट झाली आहे. यावर्षी कंपनीने एकूण जून महिन्यात 4 लाख 4 हजार 474 वाहनांची विक्री केली आहे.
स्कुटरची विक्री 7.90 टक्क्यांनी वाढली
जून महिन्यात हिरोच्या स्कुटरची विक्री वाढली आहे. कंपनीने जून महिन्यात 32 हजार 519 स्कुटर्सची विक्री केली आहे. तर 2022 मध्ये याच कालावधीत हिरोने एकूण 23 हजार 446 स्कुटर्सची विक्री केली होती. प्रत्येक महिन्याला स्कुटर्सच्या विक्रीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मे 2023 मध्ये कंपनीने 30 हजार 138 स्कुटर्स विकल्या होत्या. मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात स्कुटर्सची विक्री 7.90 टक्क्यांनी वाढली आहे.
हिरोच्या निवडक स्कुटर्स आणि बाईक्स महागणार
आजपासून देशातील हिरोच्या निवडक स्कुटर्स आणि बाईक महाग होणार आहेत. हिरो मोटोकॉर्पने वाहनांची किंमत 1.5 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. सध्या देशात मान्सून सुरू झाला आहे. तसेच लवकरच सणासुदीच्या हंगामात आर्थिक मागणीत वाढ होऊ शकते. या दृष्टीने कंपनीने वाहनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Source: hindi.financialexpress.com