Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hero MotoCorp: हिरो मोटो कॉर्पकडून इलेक्ट्रिक दुचाकी बनवणाऱ्या 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक

hero invest in Ather electric

Image Source : www.heromotocorp.com/www.constructionworld.in

हिरो मोटो कॉर्पने इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती करणाऱ्या स्टार्टअप कंपनीमध्ये 550 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हिरो कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुंतवणुकीस परवानगी मिळाली.

Hero MotoCorp Invest in Ather: देशातील आघाडीची दुचाकी निर्मिती कंपनी हिरो मोटो कॉर्पने एथर कंपनीमध्ये 550 कोटींची गुंतवणूक केली. एथर ही इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती करणारी बंगळुरू स्थित स्टार्टअप कंपनी आहे. एथर पुढील वर्षी IPO द्वारे निधी उभारण्याच्या तयारीत देखील आहे. मात्र, त्याआधी कंपनीला निधी उपलब्ध झाला.

हिरो मोटो कॉर्पचा एथर कंपनीत 33% हिस्सा आहे. काल(सोमवार) हिरो मोटो कॉर्पच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत गुंतवणूक करण्याच्या निर्णयास मान्यता मिळाली. राइट इश्यू द्वारे ही गुंतवणूक करण्यात आल्याचे हिरो कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. 

2024 मध्ये एथरचा IPO येणार?

2024 साली एथर एनर्जी IPO आणण्याच्या तयारीत आहे. 11 महिन्यांपूर्वी एथरने Caladium Investment Pte Ltd कडून 50 मिलियन डॉलर निधी उभारला होता. Herald Square Ventures कंपनी सुद्धा या राऊंडमध्ये सहभागी झाली होती. 700 मिलियन डॉलर मुल्यांकनावर एथरने निधी उभारला होता. मात्र, 11  महिन्यानंतर पुन्हा कंपनीला निधीची गरज भासली.  

नफा मिळवण्यासाठी एथरची धडपड 

तरुण मेहता आणि स्वप्नील जैन यांनी 2013 साली एथर या इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती कंपनीची बंगळुरू येथे स्थापना केली. तेव्हापासून कंपनी मार्केटमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे. मात्र, अद्यापही कंपनी तोट्यात असून 2022 आर्थिक वर्षात कंपनीला 344 कोटींचा तोटा झाला. ओला, अँपियर, ओकिनावा, रिव्होल्ट, टीव्हीएस या कंपन्यांसोबत एथरची स्पर्धा आहे. 

सर्वात मोठे चार्जिंग नेटवर्क 

एथरच्या सध्या बाजारात Ather 450X and Ather 450S या दोन गाड्या आहेत. देशातील सर्वात मोठे फास्ट चार्जिंगचे नेटवर्क उभारल्याचा दावा एथरने केला आहे. 99 शहरांमध्ये 1400 पेक्षा जास्त चार्जिंग स्टेशन आहेत. ऑगस्ट महिन्यात एथर कंपनीच्या 6,780 गाड्यांची विक्री झाली. ओला सध्या इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीत आघाडीवर आहे. मात्र, गाड्यांची विक्री मागील काही महिन्यांपासून रोडावली आहे. 

सध्या तामिळनाडूतील होसूर येथे एथरचा निर्मिती प्रकल्प आहे. तर नुकतेच याच जिल्ह्यात दुसर्‍या निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन केले. सध्या कंपनी वार्षिक 4.2 लाख गाड्यांची निर्मिती करते. मात्र, वार्षिक 15 लाख गाड्यांची निर्मिती करण्याचे ध्येय आहे.