गेल्या काही वर्षांपासून भारतात मेडिकल टूरीजम मोठ्या प्रमाणात वाढलंय. देशोविदेशातील पर्यटक आता भारतात उपचार घेण्यासाठी येत आहेत. याचा सरळसरळ परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर देखील जाणवू लागला आहे. गेल्या दशकात मेडिकल टूरीजमच्या माध्यमातून भारतात 740 कोटी डॉलरची उलाढाल झाली असल्याचे समोर आले आहे. तुलनेने स्वस्त आणि उत्तम अशी भारतीय आरोग्य पद्धती जाणून घेण्यासाठी विदेशी नागरिक मोठ्या प्रमाणात भारतात येत असतात. आयुर्वेद, पंचकर्म या आणि अशा विविध भारतीय उपचार पद्धतींचा फायदा परदेशी नागरिकांना झालेला पहायला मिळतो आहे. याचाच परिणाम म्हणून दरवर्षी आरोग्य उपचार घेण्यासाठी भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे.
इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या BIMSTEC (बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टिसेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन) हेल्थ फोरमच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या पाच वर्षांत भारताच्या आरोग्य क्षेत्रात खाजगी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
भारत ने पिछले एक दशक में Medical Tourism से 740 करोड़ डॉलर की आय अर्जित की है और अगले 10 साल में ये आंकड़ा बढ़कर 4,350 करोड़ डॉलर पर पहुंचने की उम्मीद है। बुधवार को कहा कि पिछले पांच साल में भारत के स्वास्थ्य क्षेत्र में कई निजी निवेश हुए हैं।#medicaltourism #india #medicine pic.twitter.com/XxxxDehmYj
— Industrial Empire (@Indust_empire) June 15, 2023
BIMSTEC चे काम
1997 साली ‘बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टिसेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन’ ही सात दक्षिण आशियाई आणि आग्नेय आशियाई राष्ट्रांची एक आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन करण्यात आली. यांत भारत, बांग्लादेश, भूतान, श्रीलंका,नेपाळ, म्यानमार आणि थायलंड हे देश सहभागी आहेत. या सात देशांत औद्योगिक, तांत्रिक आणि आरोग्य विषयक सुविधांची देवाणघेवाण या संस्थेमार्फत केली जाते. या संस्थेचे मुख्यालय ढाका, बांग्लादेश येथे आहे.
भारत आणि थायलंड या दोन देशांमध्ये हेल्थ टूरीजम सध्या जोर धरत असून, कोविडनंतर अनेक लोक आता पर्यटनासोबत आरोग्य-उपचार घेण्यासाठी या देशांना भेटी देत आहेत. भारत हा देश खरे तर विविधतेने नटलेला आहे. बहुविविध पर्यटनस्थळे भारतात असल्याने परदेशी नागरिक तसेही पर्यटनासाठी भारतात येत असतात. मात्र आता पर्यटनासोबतच आरोग्योपचार घेणे देखील लोक पसंत करत आहेत.
या आहेत सुविधा
भारतातील मेडिकल टूरीजम उद्योगात रुग्णालये, वैद्यकीय उपकरणे, क्लिनिकल टेस्ट, आउटसोर्सिंग, टेलिमेडिसिन, वैद्यकीय पर्यटन, आरोग्य विमा आणि वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे, हवामान बदलामुळे, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे नागरिकांना वेगवगेळ्या आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच भारतातील आरोग्यसुविधा या परवडणाऱ्या दरात आहेत. भारताची आरोग्य सेवा वितरण प्रणाली देखील आता सक्षम झाली आहे. आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आयुर्वेद, योग, प्राकृतिक चिकित्सा, यूनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी क्षेत्रात बहुविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सरकारी उपक्रम भारतातील आरोग्य बाजाराला चालना देत आहेत.
कॉस्मेटिक सर्जरी, स्ट्रेस रिलीफ, स्पा, ऑर्गन ट्रान्सप्लांट, कॅन्सरवरचे उपचार, जॉईंट रिप्लेसमेंट आदी समस्यांसंबंधी उपचार घेण्यासाठी विदेशी पर्यटक भारतात येत असतात. चेन्नई, मुंबई, नवी दिल्ली, गोवा,बंगळूरू, अहमदाबाद, कोइम्बतूर, वेल्लोर, अलेप्पी, हैदराबाद या काही प्रमुख शहरांना मेडिकल टूरीजमच्या निमित्ताने विदेशी पर्यटक भेटी देत असतात.