संयुक्त बॅंक खात्यामध्ये (Joint Bank Account) विश्वासार्हता हा महत्त्वाचा भाग असतो. दोन किंवा त्यापेक्षा अधिक लोकांमध्ये असलेल्या विश्वासावर संयुक्त खाते काढले जाते. यामध्ये नातेवाईक, पती-पत्नी किंवा व्यावसायिक भागीदार यांचा समावेश असू शकतो. संयुक्त खात्याचे काम हे बचत खात्यानुसारच चालते फक्त या खात्यात एकापेक्षा अधिक खातेदार असतात. हल्लीच्या काळात पैसे किंवा बचत ही अधिककरून बँकेत जमा केली जाते. ही बचत पती-पत्नीने संयुक्त खात्यात ठेवली तर कुटुंब म्हणून आपल्याकडे किती पैसे जमा आहेत; याचा हिशोब लागणे आणि तसेच खर्चाचे नियोजन करणे सोपे होऊ शकते.
संयुक्त खाते (Joint Account) म्हणजे काय?
संयुक्त खाते हे बचत खाते असून ते दोन किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्रितरीत्या चालवले जाते. संयुक्त खात्यातील सर्व खातेधारकांना खात्यातील रक्कम काढण्याची किंवा भरण्याची मुभा असते आणि ते सगळे जण याच्या संबंधित व्यवहार करू शकतात. संयुक्त खाती विशेषत: विवाहित जोडपी, जवळचे नातेवाईक आणि व्यावसायिक भागीदार काढतात.
संयुक्त खात्याचे प्रकार
आपल्याकडील बॅंका विशिष्ट हेतुंसाठी आणि ग्राहकांच्या सुलभतेसाठी विविध प्रकारची संयुक्ती खाती सुरू करण्याची सुविधा देतात.
- एक (आयदर) किंवा उर्वरित (सर्व्हायव्हर) Either or Survivor
- कोणीही (एनीवन) किंवा उर्वरित (सर्व्हायव्हर) Anyone or Survivor
- अगोदरचा (फॉर्मर) किंवा उर्वरित (सर्व्हायव्हर) Former or Survivor
- नंतरचा (लॅटर) किंवा उर्वरित (सर्व्हायव्हर) Latter or Survivor
- संयुक्त (जॉईंट) Jointly
- 18 वर्षांखालील बालकांचे (मायनर) खाते Accounts for children under 18 or Minor Account
पती-पत्नीचे संयुक्त खाते असेल तर होणारे फायदे...
संयुक्त खात्यामध्ये पती आणि पत्नी या दोघांनाही खात्याचा वापर करता येतो. ते दोघेही खात्यातून पैसे काढू आणि भरू शकतात. पती-पत्नी दोघेही नोकरी करणारे असतील तर दोघांचाही पगार एका संयुक्त खात्यात जमा होऊ शकतो. या खात्याद्वारे ते दोघे क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा ही वापर करू शकतात. संयुक्त खात्यामुळे पैशांचा हिशोब ठेवणे आणि त्याचे नियोजन करणे सोपे जाऊ शकते. संयुक्त खात्याद्वारे बँकेतून लोन सुद्धा मिळू शकते.
संयुक्त खात्याचे तोटे...
संयुक्त खात्याचे जसे फायदे आहेत, तसेच त्याचे काही दुष्परिणाम सुद्धा आहेत. पती-पत्नीपैकी एक जण बचत करणारा आणि दुसरा वायफळ खर्च करणारा असेल कुटुंबाच्या आर्थिक नियोजनात गडबड होऊ शकते. संयुक्त खात्यात सर्व खातेदारांचा पैशांवर समान हक्क असतो. त्यामुळे इतर खातेदाराकडून पैशांचा गैरवापर किंवा अफरातफर होण्याची शक्यता असते.
पती-पत्नी वेगळे होणार असतील तर संयुक्त खात्याचे काय होते?
जोडीदाराचे संयुक्त खाते असेल आणि काही विशिष्ट कारणांमुळे ते वेगळे होणार असतील तर, संयुक्त खात्यातील मालमत्ता विभागून घेणे उचित ठरू शकते. हे करताना एकत्रित किती बॅंक खाती आहेत; त्याची यादी करून दोघांच्या संमतीने खात्यातील रकमेची विभागणी करू शकता. किंवा ती खाती बंद करण्यासाठी प्रक्रिया सुरू करू शकता. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असते. पण पती-पत्नी कोर्टात गेले असतील तर त्यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणावर निर्णय होईपर्यंत संयुक्त खाते बंद करण्यासाठी वाट पहावी लागेल. हे टाळण्यासाठी पती-पत्नीने सामंजस्याने नवीन वैयक्तिक बॅंक खाते उघडून त्या खात्यात संयुक्त खात्यातील बचत ट्रान्सफर करावी.
संयुक्त बॅंक खाते कुटुंबातील सदस्यांसाठी आणि विशेषत: पती-पत्नीसाठी अनेक प्रकारे फायद्याचे ठरू शकते. या खात्याने दोघेही एकाच ध्येयाने बचतीसाठी प्रयत्न करू शकतात.