Rasna insolvency: रसना हा इन्सटंट ड्रिंक ब्रँड भारतातील घराघरात पोहचला आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये हे पेये 90 च्या दशकात खूप प्रसिद्ध होते. ‘आय लव यू रसना’ ही जाहिरात तुम्ही नक्कीच पाहिली असेल. या रसना कंपनीवर अवघ्या 71 लाख रुपयांच्या थकीत व्यवहारावरून दिवाळखोरीत निघण्याची वेळ आली. दरम्यान, अहमदाबाद उच्च न्यायालयाचा कंपनीला दिलासा मिळाला आहे.
रसना ही अहमदाबाद येथील पेय निर्मिती कंपनी आहे. विविध फळांच्या फ्लेवरपासून शीतपेये आणि इतरही उत्पादने कंपनीकडून तयार करण्यात येतात. 50 पेक्षा जास्त देशांमध्ये कंपनीची उत्पादने निर्यात होतात. मात्र, पेमेंट थकवल्यावरून एका कंपनीने रसनाला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) या दिवाळखोरी न्यायालयात खेचले. NCLT ने दिवाळखोरीची प्रक्रियाही सुरू केली होती.
काय आहे प्रकरण?
Bharat Road Carriers ही वाहतूक क्षेत्रातील कंपनी रसना इंडस्ट्रीजला माल वाहतूक आणि पुरवठा करण्यास मदत करते. रसना कंपनीने 71 लाख 27 हजार रुपयांचे पेमेंट बुडवल्याचा आरोप या कंपनीने केला आहे. अहमदाबाद येथील दिवाळखोरी न्यायालयात प्रकरणही दाखल केले. NCLT ने सप्टेंबरला रसना विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली होती. रविंद्र कुमार गोयल यांनी मध्यस्थी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
दरम्यान, NCLT च्या आदेशाविरोधात रसना कंपनीने गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने दिवाळखोरी प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. हे थकीत प्रकरण 2017-18 सालचे आहे. तेव्हा भारत रोड कॅरिअरने रसनाला मालाचा पुरवठा केला होता. 2019 साली पेमेंट्सचा दावा रसनाकडे केला होता. तेव्हापासून दोन्ही कंपन्यांमध्ये वाद सुरू आहे.
रसना कंपनीचे म्हणणे काय?
भारत रोड कॅरियर्सने ज्या थकीत रकमेचा दावा केला आहे ती रक्कम खरी नाही. यातील अनेक पावत्या खोट्या आहेत, असे रसना कंपनीने म्हटले आहे. रसनाने या प्रकरणी सिव्हिल कोर्टात खटला दाखल केला असून 1.25 कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे. 71 लाख रुपयांच्या छोट्या रकमेसाठी रसना कंपनी दिवाळखोरीत जाणार नाही, असे जाणकारांचे मत आहे.