Balgopal Bank: मुलांना अर्थसाक्षर बनवनं ही आजची गरज आहे. बचत, गुंतवणूक या संकल्पना शालेय अभ्यासक्रमात यापूर्वी शिकवल्या जात नव्हत्या. आता कुठे मुलांना अर्थसाक्षर करण्यासाठी पालकांची धडपड सुरू झाली आहे. मात्र, गुजरात राज्यातील एक चिल्ड्रन बँक 2009 पासून मुलांना अर्थसाक्षर करतेय. या बँकेत बालकांच्या तब्बल 16 कोटींच्या ठेवी आहेत.
लहान मुलांना आई-वडीलांकडून, नातेवाईकांकडून खाऊसाठी मिळणारे पैसे बँकेत जमा करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. उद्योग, व्यवसायात तर गुजराती नागरिक पुढे आहेत. मात्र, बालकांना पैशाचे महत्त्व समजून सांगण्यातही पुढं असल्याचे या उदाहरणातून दिसते.
केंद्रीय मंत्र्याकडूनही बालगोपाल बँकेचे कौतुक
या चिल्ड्रन को-ऑपरेटिव्ह बँकेचे नाव ‘बालगोपाल बँक’ असे असून गुजरात राज्यातील साबरकांठा जिल्ह्यातली इदार या गावात आहे. विशेष बाब म्हणजे या बँकेचे केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाल यांनी राज्यसभेत कौतुकही केले. लहान मुलांना बचत, गुंतवणुकीची शिकवण देण्यात ही बँक आघाडीवर आहे. बँक प्रतिनिधी मुलांच्या घरी जाऊन दरमहा पैसे जमा करून घेतो. तसेच याची पावतीही दिली जाते.
किती वयोगटापर्यंतच्या बालकांची खाती
बालगोपाल बँकेत शून्य ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांचे खाते सुरू करता येते. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी किंवा कोणत्याही कामासाठी बालक पैसे काढून घेऊ शकतो. तसेच मधल्या काळात पैशांची गरज पडली तरी पैसे काढता येतात. दर महिन्याला 200 ते 300 नवी खाती बँकेत सुरू होतात, असे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मनी कंट्रोलने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बँकेकडून 3 कोटींचे कर्जवाटप
ही चिल्ड्रन को-ओपरेटिव्ह बँक 2009 साली सुरू झाली आहे. तेव्हापासून 3 हजार खातेदारांनी 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पैसे काढून घेतले आहेत. तसेच या बँकेने 3 कोटींची कर्ज दिली आहे. बँकेतील ठेवींवर बालकांना 6 टक्के व्याज मिळते. तर 12 टक्क्यांनी बँक कर्ज देते. त्यातून बँकेला उत्पन्नही मिळते. तसेच या बँकेत खाते सुरू करण्यासाठी 110 रुपये शुल्क आहे.
बँकेकून शिकवली जाते अर्थसाक्षरता
पाच वर्षाचे मूल झाल्यानंतर बँकेडून बाल खातेदारांना बचतीचे महत्त्व समजून सांगितले जाते. मुलांनी स्वयंपूर्ण जीवन जगावे यासाठी बँक प्रयत्नशील असल्याचे बँकेचे चेअरमन आश्विन पटेल म्हणतात. दरमहा विद्यार्थी या बँकेत काही रक्कम जमा करतात. तसेच एकूण रकमेच्या 50% पर्यंत कर्जही दिले जाते. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी होतो.