Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पूर्णवेळ नोकरीसोबत स्वतःचा व्यवसाय कसा करावा? वाचा

Business with full time job

Image Source : https://www.freepik.com/

पूर्णवेळ नोकरीसह स्वतःचा व्यवसाय सुरू करणे कधीही फायद्याचे ठरते. मात्र, अनेक आव्हानांना देखील सामोरे जावे लागते. नोकरी व व्यवसाय या दोन्हींचे आपआपले फायदे-तोटे आहेत. त्यामुळे नक्की कशाची निवड करावी हे तुमच्याकडील भांडवल व कौशल्यावरून ठरत असते.

बहुतांशजण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खासगी अथवा सरकारी नोकरीकडे वळतात. अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, परंतु भांडवल नसल्याने ते शक्य होत नाही. अशावेळी पूर्णवेळ नोकरीसह कमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय योग्य ठरतो.

नोकरीमध्ये आर्थिक स्थिरता तर असते, मात्र मिळणारा पगार देखील मर्यादित असतो. केवळ नोकरीच्या पगारामध्ये हवे तसे आयुष्य प्रत्येकालाच जगता येत नाही. त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य हवे असल्यास स्वतःचा व्यवसाय करणे कधीही योग्य ठरते. 

सध्याच्या महागाईच्या काळात आर्थिक उत्पन्नाचे एकापेक्षा अधिक स्त्रोत असणे कधीही ठरते. पूर्णवेळ नोकरीसह स्वतःचा व्यवसाय सुरू करणे सोपे नसले तरीही याचे फायदे मात्र नक्कीच जास्त आहेत. नोकरी करतानाच सुरू केलेला व्यवसाय भविष्यात  मोठा होऊ शकतो. 

तुम्ही देखील नोकरीसह स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते? याचे फायदे काय आहेत? नोकरी करतानाच कोणते व्यवसाय सुरू करू शकता? नोकरी कधी सोडावी? अशा प्रश्नांची उत्तरे या लेखातून सविस्तर जाणून घेऊयात.

तुमच्यासाठी काय योग्य – नोकरी की व्यवसाय ?

तुम्ही जर करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असाल तर तुमच्यासाठी नोकरी की व्यवसाय, यापैकी काय योग्य आहे याची निवड करणे गरजेचे आहे. नोकरी व व्यवसाय या दोन्हींचे आपआपले फायदे-तोटे आहेत. त्यामुळे नक्की कशाची निवड करावी हे तुमच्याकडील भांडवल व कौशल्यावरून ठरत असते. 

सध्या महागाई प्रचंड वाढली आहे. अनेकांना खर्च भागविण्यासाठी एकाचवेळी दोन नोकऱ्या कराव्या लागतात. भारतात एकापेक्षा जास्त नोकरी करण्याची संस्कृती अद्याप रुजलेली नसली तरी काही देशांमध्ये पूर्ण वेळ नोकरीसोबतच पार्ट टाईम अथवा फ्रीलान्सर म्हणून काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.  नोकरीसोबतच व्यवसाय सुरू केल्यास करिअरच्या दृष्टीने नवीन संधी निर्माण होतात व एक वेगळा अनुभव देखील मिळतो.

थोडक्यात, तुमची आवड, भांडवल क्षमता, जोखीम स्विकारण्याची क्षमता, कौशल्य या आधारावर नोकरी करावी की स्वतःचा व्यवसाय हे ठरवू शकता. जर तुमच्याकडे भांडवलाची कमतरता असल्यास पूर्णवेळ सोबतच कमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करणे कधीही चांगले. यामुळे नोकरीच्या पगारातून तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण होतील व पैशांसाठी केवळ व्यवसायावर अवलंबून राहावे लागणार नाही.

नोकरी सोडण्याआधी करा विचार 

अनेकजण भावनेच्या भरात नोकरी सोडण्याचा निर्णय घेतात. केवळ व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचणे व त्यासाठी ठोस योजना असणे यात मोठा फरक आहे. तुम्ही जर कोणतीही बचत व उत्पन्नाचा स्त्रोत नसताना नोकरी सोडण्याचा निर्णय घेतल्यास भविष्यात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची अत्यंत गरज असते. अशावेळी नोकरी सोडल्यास उत्पन्न थांबते. त्यामुळे गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक स्थिरता असणे अत्यंत गरजेचे आहे. 

नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे योग्य कौशल्य, भांडवल असणे गरजेचे आहे. थेट नोकरी सोडून व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला व त्यात यश मिळाले नाही तर? अशा स्थितीत तुमच्याकडे आर्थिक पाठबळ असणे आवश्यक आहे.

करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात नोकरी करणे कधीही योग्य आहे. कारण, या कामातून मिळालेला अनुभव स्वतःचा व्यवसाय करताना उपयोगी येईल. त्यामुळे नोकरीसोबतच स्वतःचा व्यवसाय सुरू करावा व व्यवसायाची वाढ झाल्यास नोकरी सोडण्याचा निर्णय घेणे योग्य ठरते.

नोकरीसोबत स्वतःचा व्यवसाय करण्याचे फायदे 

अतिरिक्त उत्पन्नपूर्णवेळ नोकरीसह स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यातून मिळणारे अतिरिक्त उत्पन्न. नोकरीच्या पगारातून तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण होत असतात. दरमहिना उत्पन्न चालू असते, त्यामुळे आर्थिक जबाबदाऱ्या पार पडणे शक्य होते. परंतु, केवळ नोकरीच्या पगारातून सर्वच गरजा पूर्ण होत नाहीत. व्यवसायातून मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नातून तुम्ही कर्ज फेडू शकता, घर-गाडी खरेदी करण्यासाठी पैशांची बचत करू शकता. थोडक्यात, या उत्पन्नातून आर्थिक स्थिरता प्राप्त होते.
नवीन अनुभवभविष्यात स्वतःचा मोठा व्यवसाय उभारण्यासाठी अनुभवाची गरज असते. सुरुवातीच्या टप्प्यात हा अनुभव पूर्णवेळ नोकरीसह व्यवसाय करताना नक्कीच मिळेल. तुम्हाला व्यवसायाशी संबंधित अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतील. तुम्हाला नवीन कौशल्य शिकायला मिळतील, ज्याचा उपयोग व्यवसाय व जीवनात देखील होईल.
नेटवर्किंग  स्वतःचा व्यवसाय करताना अनेक नवनवीन लोकांना भेटण्याची संधी मिळते. सध्याच्या काळात तुमच्या जेवढ्या अधिक लोकांशी ओळखी असतील, तेवढा अधिक फायदा व्यवसायासाठी होतो. याच माध्यमातून तुम्हाला व्यवसायासाठी नवीन ग्राहक देखील मिळतील. याशिवाय, नोकरीच्या निमित्ताने ज्या व्यक्तींशी तुमचा संपर्क झाला त्याचा देखील फायदा व्यवसायासाठी करून घेता येईल. 
आवडीचे काम करण्याची संधी अनेकजण नोकरी केवळ पगार व आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी करतात. मात्र, स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यास आवडीचे काम करण्याची संधी मिळते. तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रानुसार व्यवसायाची निवड करू शकता. यामुळे अतिरिक्त कमाई तर होईलच. याशिवाय, आवडीचे काम देखील करता येईल. 

पूर्णवेळ नोकरीसह व्यवसाय करताना येणारी आव्हाने 

वेळ एकाचवेळी नोकरी व व्यवसायासाठी वेळ देणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. काही व्यवसायांसाठी दिवसातील 2-3 तास देणे शक्य आहे. परंतु, सर्वच व्यवसायांसाठी असे करता येत नाही. अनेक असे व्यवसाय आहेत, ज्यासाठी तुम्हाला कोणत्याही वेळी उपलब्ध असावे लागते. अन्यथा ग्राहकांपर्यंत योग्य वेळेत सेवा पोहचवणे शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही जर नोकरीसह व्यवसाय करताना वेळेचे योग्य प्रकारे नियोजन करू शकत असाल तर नक्कीच यश मिळू शकते.
वर्क लाइफ बॅलेन्सएकाचवेळी नोकरी व व्यवसाय सांभाळणे आव्हानात्मक असू शकते. अनेकजण दिवसातील 10 ते 12 तास कंपनीत काम करतात. अशावेळी स्वतःच्या व्यवसायासाठी अतिरिक्त वेळ देणे शक्य होत नाही. यातूनही व्यवसायासाठी अतिरिक्त वेळ दिला तर ‘वर्क लाइफ बॅलेन्स’चा प्रश्न निर्माण होतो. थोडक्यात, कुटुंबासाठी व स्वतःच्या आवडी-निवडी जोपासण्यासाठी वेळ मिळत नाही. मात्र, काहीतरी साध्य करण्यासाठी कशाचा तरी त्याग करणे गरजेचे असते. 
कंपनीचे धोरणअनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना इतर कामे करण्याची परवानगी नसते. काही दिवसांपूर्वी ‘Moonlighting’ हा शब्द विशेष चर्चेत आला होता. याचा अर्थ तुमच्या कंपनीला माहिती न देता नोकरीसह इतर काम करणे. मात्र, अनेकदा यामुळे समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे तुम्हाला नोकरी देखील गमवावी लागू शकते. तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करून कंपनीचे नियम तर मोडत नाही ना, हे पाहा. याशिवाय, नोकरीची वेळ स्वतःच्या व्यवसायासाठी वापरणे टाळा.
गुंतवणूकव्यवसाय सुरू करताना भांडवलाची गरज असते. तुमच्या नोकरीतून मिळणाऱ्या पगारातून व्यवसायासाठी गुंतवणूक केल्यास इतर आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी समस्या येऊ शकते. त्यामुळे भांडवलाची पूर्तता झाल्यानंतरच व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जोपर्यंत व्यवसाय सुरळीतपणे चालत नाही, तोपर्यंत नोकरी सोडू नका.

योग्य व्यवसायाची निवड करा

पूर्णवेळ नोकरीसोबत जो व्यवसाय करणार आहात, त्याची योग्य निवड करणे गरजेचे आहे. तुमचे भांडवल, कौशल्य व आवड या गोष्टी ज्या व्यवसायाशी जुळू शकतील असाच व्यवसाय निवडा. तुमच्याकडे कंपनीत काम केल्यानंतर किती मोकळा वेळ आहे, याचाही विचार करणे आवश्यक आहे.

पूर्णवेळ नोकरीसह व्यवसाय करताना तंत्रज्ञानाची मदत नक्की घ्या. ऑनलाइन माध्यमातून चालणारा व्यवसाय सुरू केल्यास तुम्हाला पूर्णवेळ नोकरीनंतर घरून देखील काम करता येईल. याशिवाय, घरातील इतर व्यक्ती देखील कामात मदत करू शकतील, असा व्यवसाय निवडल्यास नक्कीच फायदा होईल. महत्त्वाचे म्हणजे, असा व्यवसाय निवडा जो तुम्ही कमी वेळ काम करून जास्त उत्पन्न मिळवून देईल. 

पूर्णवेळ नोकरीसोबत कोणते व्यवसाय करू शकता?

ऑनलाइन क्लासेस

 तुम्हाला जर एखाद्या विषयाचे अथवा भाषेचे पूर्ण ज्ञान असल्यास पूर्णवेळ नोकरीसह ऑनलाइन क्लासेस घेऊ शकता. सध्या ऑनलाइन क्लासेसची लोकप्रियता वाढली आहे. पालकांना त्यांच्या मुलांना शिकविण्यासाठी चांगल्या शिक्षकांची गरज असते. तुम्ही दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी मुलांना शिकवू शकता. 

होम ट्यूटरिंग देखील सध्या लोकप्रिय आहे. तुम्ही मुलांना थेट त्यांच्या घरी जाऊन देखील शिकवू शकता. तुम्हाला जर स्पॅनिश, फ्रेंच, कोरियन अशा इतर भाषा येत असल्यास याचे देखील क्लासेस घेता येतील. तुम्ही अशा क्लासेससाठी तासानुसार शुल्क आकारू शकता व यातून तुमची चांगली कमाई होईल. तसेच, तुम्ही ज्या विषयात तज्ञ आहात त्याची माहिती देणारे व्हीडिओ युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करू शकता.

सोशल मीडिया मॅनेजरआपण दिवसभर सोशल मीडियावर वेळ घालवतो. मात्र, याच सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकता व यासाठी तुम्हाला नोकरी सोडण्याची देखील गरज नाही. अनेक व्यवसाय व प्रसिद्ध व्यक्तींना त्यांचे सोशल मीडिया अकाउंट सांभाळण्यासाठी मॅनेजरची गरज असते. तुम्हाला जर सोशल मीडिया मार्केटिंग व इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर), फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मच्या फीचर्सबाबत संपूर्ण माहिती असल्यास पूर्णवेळ नोकरीसह सोशल मीडिया मॅनेजर म्हणून देखील काम करता येईल. 
ऑनलाइन स्टोरआज स्मार्टफोनच्या एका क्लिकवर कपडे, खेळणी, इलेक्ट्रिक वस्तू घरपोच मागवता येतात. त्यामुळे तुम्ही देखील स्वतःचे ऑनलाइन स्टोर सुरू केल्यास नक्कीच यातून कमाई होऊ शकते. यासाठी केवळ वेबसाइट सुरू करून त्यावर वस्तूंची माहिती द्यावी लागेल. तुम्ही कपडे, सौंदर्यप्रसाधने, बॅग्स, पुस्तक इत्यादींची विक्री करू शकता. ग्राहकांनी ऑर्डर केल्यानंतर तुम्ही वस्तूंची डिलिव्हरी करू शकता. हे काम पूर्णवेळ नोकरीसोबत करणे सहज शक्य आहे. तुमचा व्यवसाय वाढल्यानंतर नोकरी सोडण्याचा देखील विचार करू शकता. 
कॉन्टेंट क्रिएशन 

तुम्हाला जर लिहायला आवडत असेल तर कॉन्टेंट क्रिएशनच्या माध्यमातून पैसे कमवू शकता. स्वतःची वेबसाइट सुरू करून वेगवेगळ्या विषयांची माहिती देऊ शकता. तसेच, अनेकांना वेगवेगळ्या विषयांची माहिती देणारे लेख हवे असतात. तुम्ही इतरांना लेख लिहून देऊ शकता.

तुम्ही केवळ लेखनच नाही तर व्हीडिओच्या माध्यमातून देखील कमाई करू शकता. तुम्ही वेगवेगळ्या विषयांची माहिती देणारे व्हीडिओ युट्यूबवर अपलोड करू शकता. तसेच, इतरांसाठी देखील व्हीडिओ तयार करून कमाई करणे शक्य आहे. 

रिपेअरिंग सेवातुम्हाला जर इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त करता येत असल्यास पूर्णवेळ नोकरीसह हा व्यवसाय सुरू करता येईल. तुम्ही तुमच्या वेळेनुसार ग्राहकांच्या घरी जाऊन फ्रिज, एसी सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त करून देऊ शकता. तसेच, मोबाइल, कॉम्प्युटर दुरुस्त करता येत असल्यास या कामातूनही तुमची भरपूर कमाई होईल. 

विशेष म्हणजे वरील कोणत्याही कामासाठी तुम्हाला नोकरी सोडण्याची गरज नाही. तुम्ही नोकरीसह अतिरिक्त कमाईसाठी हे व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही 8-10 तासांच्या नोकरीनंतर सायंकाळी 2-3 तास वेळ या कामांसाठी देऊ शकता. याशिवाय, शनिवार-रविवारी सुट्टी असल्यास हे काम करणे शक्य आहे. या कामातून तुम्हाला पैसे तर मिळतीलच, सोबतच स्वतःचा मोठा व्यवसाय उभारण्यासाठी लागणारा अनुभव देखील मिळेल. या व्यवसायांमधून नोकरीऐवढेच उत्पन्न मिळू लागल्यास नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊ शकता.