वर्ष 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्ठेची घोडदौड कायम असल्याचे दिसून आले आहे. सरत्या वर्षातील शेवटच्या महिन्याच डिसेंबर 2022 मध्ये केंद्र सरकारला वस्तू आणि सेवा करातून एकूण 1.49 लाख कोटींचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जीएसटी उत्पन्नात 15% वाढ झाली.
सरकारकडून रविवारी 1 जानेवारी 2023 रोजी डिसेंबर महिन्यातील जीएसटीची आकडेवारी जागीर करण्यात आली. त्यानुसार गेल्या महिन्यात जीएसटीतून सरकारला 1.49 लाख कोटींचा महसूल मिळाला. सणासुदीचा हंगामात ग्राहकांनी खरेदीवर जोर दिल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याचे दिसून आले. नोव्हेंबर 2022 मध्ये जीएसटीमधून 1.46 लाख कोटींचा महसूल मिळाला होता.
डिसेंबर 2022 मध्ये जीएसटीमधून 149507 कोटींचा महसूल मिळाला. यात सीजीएसटी (CGST)26711 कोटी, एसजीएसटी (SGST) 33357 कोटी, आयजीएसटी (IGST) 78434 कोटी आणि सेसमधून (Cess) 11005 कोटींचा महसूल मिळाल्याचे सरकारने म्हटले आहे.
सरकारने याच महिन्यात सीजीएसटीचा 36669 कोटी आणि एसजीएसटीचे 31094 कोटींचा परतावा दिला. यामुळे डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारकडून राज्यांना 63380 कोटी सीजीएसटी आणि 64451 कोटी एसजीएसटीपोटी अदा करण्यात आले. गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत यंदा जीएसटी संकलनात 15% वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यंदा जीएसटीच्या व्यवहारांमध्येही प्रचंड वाढ झाल्याचे सरकारने म्हटले आहे.
अर्थ खात्याने दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात आयात केलेल्या वस्तूंवरील कर महसुलात 8% वाढ झाली. आयात केलेल्या वस्तूंवर डिसेंबर महिन्यात सरकारला 850 कोटींचा कर महसूल मिळाला. त्याशिवाय देशांतर्गत व्यवहारांवरील कर महसुलात 18% वाढ झाली. नोव्हेंबर महिन्यात 7.9 कोटी ई-वे बिलचे व्यवहार नोंदवण्यात आले.
चालू आर्थिक वर्षातील जीएसटीची आकडेवारी
महिना | जीएसटी उत्पन्न (लाख कोटी रुपयांत) |
एप्रिल | 1.68 |
मे | 1.41 |
जून | 1.45 |
जुलै | 1.49 |
ऑगस्ट | 1.44 |
सप्टेंबर | 1.48 |
ऑक्टोबर | 1.52 |
नोव्हेंबर | 1.46 |
डिसेंबर | 1.50 |