Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Successful Entrepreneur: योग व्यवसायाची वृद्धी समाजाच्या जागरूकतेवर अवलंबून - योग प्रशिक्षक देवयानी मांडवगणे

Successful Entrepreneur Yoga Instructor Devyani Mandavagane

Successful Entrepreneur: पुण्यातील कोथरूड परिसरात ‘देवयानीज योगऊर्जा’ या स्टुडिओच्या माध्यमातून देवयानी मांडवगणे यांनी अनेकांना योग व दैनंदिन व्यायाम याचे महत्त्व पटवून देत त्यांच्या आरोग्य समस्यांवर काम करून त्यांना त्यातून बाहेर काढण्याचे काम करत आहे.

आरोग्याच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न देशभरातील अनेक संस्था, संघटना आणि व्यक्ती करीत आहेत. पण त्यात औषधे आणि उपचारांवरच अधिक भर दिसून येत आहे. पण पुण्यातील देवयानी मांडवगणे या आपल्या योग स्टुडिओच्या माध्यमातून अनेकांच्या आरोग्य समस्यांवर औषधांविना उपचार करत आहेत. त्यांच्या यशस्वी प्रवासाबद्दल जाणून घेऊयात.

देवयानीज योग ऊर्जा : योगा आणि थेरपी स्टुडिओ

पुण्यातील कोथरूड परिसरात ‘देवयानीज योगऊर्जा’ या नावाने योग आणि थेरपी स्टुडिओ देवयानी मांडवगणे यांनी सुरू केला आहे. पेशाने इंजिनिअर असणाऱ्या देवयानी यांनी लोकांना योग व दैनंदिन व्यायाम याचे महत्त्व समजावून सांगत आरोग्य समस्यांचा मुळापासून अभ्यास करून त्यांना त्यातून बाहेर काढण्याचे काम करत आहे.

इंजिनिअर ते जिमच्या ब्रँड अम्बॅसॅडर

देवयानी यांनी पुण्यातील व्हीआयटी या महाविद्यालातून इलेट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (E&TC) मध्ये इंजिनियरिंगची पदवी मिळवली आहे. योगाच्या माध्यमातून सर्व वयोगटांतील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी देवयानीने व्यक्तिगत प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली. योग हेच करिअर म्हणून निवडताना तिला घरातील धार्मिक, आध्यात्मिक आणि शैक्षणिक वातावरणाचा खूप फायदा झाला. हे काम करत असतानाच तिने मुंबईत काही वर्षे फिटनेसशी निगडित मॉडेलिंग केले. यामुळे अमेरिका, कॅनडा, चीन, ऑस्ट्रेलिया, दुबई आदी देशांतील वेगवेगळ्या फिटनेससंबंधीच्या मॉडेलिंग स्पर्धेत तिने सहभाग घेतला. याच काळात देशातील प्रसिद्ध तळवलकर जिमचा ब्रँन्ड अम्बॅसडर होण्याचा बहुमान देवयानीला मिळाला. अनेक फॅशन व फिटनेस ब्रँडसोबत तिने काम केल्यामुळे तिला देश-विदेशातील ग्लॅमर दुनियेचाही अनुभव घेता आला.

लोकांच्या घरी जाऊन योग प्रशिक्षण

कला, क्रीडा व नृत्य या प्रकारांत रस असणाऱ्या देवयानी यांनी ॲथलेटिक्स, सायकलिंग, पोहणे या क्रीडा प्रकारात राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक मानसन्मान मिळवले आहेत. लोणावळा येथील कैवल्यधाम या प्रख्यात संस्थेतून अद्ययावत योग प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षण अभ्यासक्रमात तिने प्रथम क्रमांक पटकावला. सुरुवातीला पुण्यात काही लोकांच्या घरी जाऊन योग शिकवण्याचे काम देवयानीने केले. यामध्ये नामवंत कंपन्यांचे सीईओ, प्रख्यात डॉक्टर, वकील यांचा समावेश होता. याच काळात विविध संस्था, संघटना आणि कंपन्यांमध्ये योगासंबंधी जागृती करण्याच्या उद्देशाने त्यांनी कार्यशाळा घेतल्या. त्यानंतर योगा स्टुडिओची कल्पना त्यांना सुचली.

योगाच्या बॅचेससाठी कंपन्यांबरोबर टायअप

कोथरूडमधील स्टुडिओच्या रचनेसाठी देवयानी यांनी योगमधील अनेक तज्ज्ञ मंडळी व आर्किटेक्टबरोबर चर्चा करून स्टुडिओ उभारला. देवयानी यांना इंग्रजी आणि मराठी भाषेतून संवाद साधण्याचे कसब असल्यामुळे आणि योगामधील त्यांच्या अनुभवावर त्यांनी योग स्टुडिओमध्ये महिला, पुरुष आणि तरुण मुले-मुली यांची मने जिंकली. त्याचबरोबर त्यांनी काही कंपन्यांबरोबर टायअप करून, कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या बॅचेस सुरु केल्या.

व्यवसाय विस्तार समाजाच्या जागरुकतेवर अवलंबून 

आर्थिक साहाय्य घेऊन योगा स्टुडिओचा विस्तार करणे किंवा इतर उद्योग-व्यवसायांच्या फॉर्म्युल्यासारखा योगामध्ये विचार करून चालत नाही. कारखान्यासारखे कर्मचारी ठेवून किंवा शाखा काढूनही उपयोग होत नाही. कारण योगात प्रत्येकाला होणारा फायदा खूप वैयक्तिक आणि सूक्ष्म पातळीवर असतो. यातील व्यवसायविस्तार आणि प्रगती ही समाजाच्या योगाबद्दलच्या जागरुकतेवर अवलंबून आहे.

Yoga Urja (Internal Image 2)
योग ऊर्जाच्या स्टुडिओमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना.

अगदी घरातूनही होऊ शकते योगा क्लासची सुरुवात

जिम्स, सोसायटीज किंवा ग्राहकाच्या घरी जाऊन शिकवणे असे अनेक पर्याय आहेत. ज्यांना भांडवल न वापरता पटकन काम सुरू करण्याची इच्छा आहे ते स्टुडिओ किंवा हॉस्पिटलमध्ये असिस्ट करण्यापासून कामास सुरुवात करू शकतात. लहान स्वरूपात जरी व्यवसाय करायचा असेल तरी अगदी घरातूनही छोट्या प्रमाणात योगा क्लास सुरू होऊ शकतो.

नोकरी करूनही पार्टटाईम करण्याजोगा उद्योग

सोसायटीचा कम्युनिटी हॉल, रिकामा प्लॉट किंवा एखादी शांत जागा असली तरी क्लास सुरू करता येऊ शकेल. पार्ट-टाइम उद्योग अशा स्वरूपातही तो चांगल्या रीतीने होऊ शकतो. याचे कारण योग हा सकाळी लवकर पोट रिकामे असताना किंवा संध्याकाळी करता येतो. दिवसाच्या वेळात नोकरी किंवा दुसरा व्यवसाय करणे शक्य आहे. गृहिणीसुद्धा योग वर्ग चालवून घर उत्तम प्रकारे सांभाळू शकते. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची क्षमता असल्यास योग स्टुडिओ उभा करता येईल. छोट्यापासून कितीही मोठ्या ग्रुपचा योगा क्लास घेता येऊ शकतो. परंतु खूप मोठा ग्रुप असेल तर सर्वांना समाविष्ट झाल्यासारखे वाटत नाही, लक्ष देणे अवघड होते. त्यामुळे प्रत्येकाकडे लक्ष देता येईल इतकाच ग्रुप असावा. 

स्त्रोत: यशस्वी उद्योजक