देशात बाजरीला चालना देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अनेक वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. यंदाचे वर्ष हे ‘आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे अन्न मंत्रालयाकडून राज्यांना अधिक बाजरी खरेदी करण्यास सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी 2022-23 (ऑक्टोबर-सप्टेंबर) या वर्षात 7.5 लाख टन धान्य खरेदीचे लक्ष्य ठेवले आहे. त्यापैकी एकटे कर्नाटक 6 लाख टन खरेदी करणार आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
2021-22 या वर्षात 6.30 लाख टन भरड धान्याची खरेदी सरकारकडून करण्यात आली होती. 1 ऑक्टोबर 2022 पासून चालू वर्षातील खरेदी 2.63 लाख टनांवर पोहोचली आहे. ज्यामध्ये 1.36 लाख टन नाचणी आणि 1.25 लाख टन बाजरी खरेदी करण्यात आली आहे. सरकारकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात येणाऱ्या बाजरीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार आहे. म्हणूनच सरकार मोठ्या प्रमाणावर भरड धान्याचा प्रचार करत आहे.
भरड धान्याच्या प्रचारावर भर
बुधवारी झालेल्या अन्न सचिवांच्या परिषदेत सर्व राज्यांना भरड धान्य उत्पादक जिल्ह्यांमध्ये, विशेषत: आदिवासी भागात खरेदी केंद्र उघडण्यास सांगितले आहे. बिझनेस लाईनने दिलेल्या वृत्तानुसार, अन्न मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्य सरकार बाजरीच्या वापरास प्रोत्साहन देत आहे.
परिषदेला संबोधित करताना अन्न सचिव संजीव चोप्रा म्हणाले की, बाजरी खरेदी आणि वितरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर कोणत्याही राज्यात बाजरी शिल्लक राहिली, तर ती इतर राज्यांना वितरित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले, "आम्ही कर्नाटक सरकारची उर्वरित बाजरी केरळला वितरीत करण्याची परवानगी दिली आहे. याशिवाय येत्या काही वर्षांमध्ये खरेदी आणि वितरणाचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे."
पुढे चोप्रा म्हणाले, "राज्यांना आयसीडीएस, मिड-डे मील आणि पीडीएस सारख्या योजनांमध्ये बाजरी कशी वापरावी, हे कर्नाटक राज्याकडून शिकण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जे निरोगी आहारास प्रोत्साहन देण्यासाठी मदत करेल.
बाजरीची लागवड करण्याची शेतकऱ्यांना विनंती
दिल्लीच्या पुसा कॅम्पसमध्ये वार्षिक 'कृषी विज्ञान मेळाव्या'चे उद्घाटन करताना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजरीची लागवड करण्याचे आवाहन केले आहे. ज्यामुळे देशातील कुपोषण दूर होण्यासाठी मदत होईल. महत्त्वाचं म्हणजे बाजरीला कमी पाणी लागतं, मात्र बाजारामध्ये जास्त पोषण मिळते.