गेल्या वर्षभरात खाद्य तेलांच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले आहेत. रशिया-युक्रेन युद्धानंतर तेलाच्या किंमतींचा चांगलाच भडका उडाला होता. त्यांनतर देशांतर्गत टेल उत्पादन वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून कृषी मंत्रालयाने रविवारी सांगितले की, देशात तेल पाम लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध राज्य सरकारे तसेच तेल पाम तेल प्रक्रिया कंपन्यांच्या सहकार्याने 12 ऑगस्टपर्यंत एक मोठी मोहीम राबविण्यात आली आहे.
कोणत्या राज्यांमध्ये मोहीम सुरु?
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, ओडिशा, कर्नाटक, गोवा, आसाम, त्रिपुरा, नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या प्रमुख पाम तेल उत्पादक राज्यांमध्ये केंद्र सरकारने एक मोहीम सुरु केली आहे. पाम वृक्षारोपण मोहीम 25 जुलैपासून सुरू झाली आणि 12 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. यामध्ये पाम वृक्षाचे उत्पादन कसे घ्यावे, कधी घ्यावे आणि त्यातून उत्पन्न कसे वाढवावे यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. भारतात अजूनही पाम वृक्षाची शेती म्हणावी तितकी प्रचलित झालेली नाही. ईशान्य भारतातील राज्यांमध्ये ही शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. याच पार्श्वभूमीवर ज्या राज्यांमध्ये पाम उत्पादन घेतले जाते तेथे सरकार विशेष लक्ष देणार आहे, असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
India's dependence on imported #vegetableoil is a concern. However, the Government's #oilpalm development programme, #NMEO-OP seems to be a step towards reducing the gap between demand and supply of palm oil in India.
— Centre for Responsible Business (@Centre4RespBiz) July 26, 2023
Know more about how the oil palm grown in India could be made… pic.twitter.com/1lKJ90DTVt
तेल कंपन्यांची साथ!
भारतात मुख्यत्वे इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांमधून पाम तेलाची आयात केली जाते. भारतातील एकूण खाद्य तेलापैकी 60% पाम टेल वापरले जाते. येत्या काळात पाम तेलाचा मुख्य उत्पादक देश म्हणून भारताला पुढे आणण्यासाठी सरकार हे प्रयत्न करत आहे. या अभियानात कृषी विभागासोबतच तीन प्रमुख तेल पाम प्रक्रिया कंपन्या पतंजली फूड प्रायव्हेट लिमिटेड, गोदरेज ऍग्रोव्हेट आणि 3 एफ यांचाही त सहभाग आहे.
‘मिशन पाम तेल’ 2021 मध्ये सुरु
ऑइल पामचे क्षेत्र 10 लाख हेक्टरपर्यंत वाढवणे आणि 2025-26 पर्यंत क्रूड ऑइल पामचे उत्पादन 11.20 लाख टनांपर्यंत वाढवण्याच्या उद्देशाने, भारत सरकारने ऑगस्ट 2021 मध्ये राष्ट्रीय खाद्यतेल अभियान - ऑइल पाम सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून हे अभियान सुरु करण्यात आले आहे. याआधी पाम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 12 हजार रुपये दिले जात होते. या अभियानाची सुरुवात झाल्यापासून आता ही रक्कम 29 हजार रुपये करण्यात आली आहे.