गुगलने नव्याने बाजारात आणलेल्या बार्ड (Bard) या चॅटबॉटच्या जाहिरातीतील व्हिडिओमध्ये चुकीची माहिती आल्यामुळे आणि गुगलच्या या नवीन प्रोडक्टच्या लॉन्चिंगचा कार्यक्रम ग्राहकांवर प्रभाव न पाडू शकल्यामुळे गुगलची मुख्य कंपनी Alphabet Inc ला दोन दिवसांपूर्वी सुमारे 100 अब्ज डॉलरचे बाजारमूल्य गमवावे लागले. यामुळे चॅटबॉटच्या या टेक्निकल वॉरमध्ये Google मागे पडतंय की काय/ अशी चर्चा होऊ लागली आहे.
Table of contents [Show]
Alphabet च्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांनी घसरण
Alphabetचे शेअर्स 50 दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या जवळपास तिप्पट व्हॉल्यूमसह नियमित ट्रेडिंग दरम्यान सुमारे 9 टक्क्यांनी घसरले होते. त्यावेळी काही वेळाने कंपनीने बऱ्यापैकी बाजू सारवून घेतली होती. पण Alphabet च्या शेअर्समध्ये गेल्या वर्षी सुमारे 40 टक्क्यांची घसरण झाली होती. त्या तुलनेत दोन दिवसांपूर्वीचे नुकसान वगळता कंपनीची यावर्षात 15 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
‘बार्ड’च्या जाहिरातीत काय चूक होती?
रॉयटर्स न्यूज एजंसीने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्या उपग्रहाने सर्वप्रथम पृथ्वीच्या सौरमंडळाबाहेरील ग्रहांची ची छायाचित्रे घेतली. या प्रश्नाशी निगडीत दिलेल्या माहितीत Bard ने चुकीची माहिती दिल्याचे बोलले जाते.
मायक्रोसॉफ्टच्या ChatGPT ला चांगला प्रतिसाद
Microsoft चा आर्थिक पाठिंबा असलेल्या OpenAI या स्टार्टअप कंपनीने आर्टीफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित चॅटजीपीटी (ChatGPT) बाजारात आणले आहे. या नवीन प्रोडक्टने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या प्रोडक्टचे रिझल्ट बऱ्यापैकी अचूक असल्याचे बोलले जात आहे आणि ग्राहकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गुगल कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून आर्टीफिशिअल इंटेलिजन्समधील इनोव्हेशनमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहे. त्यामुळे कंपनीने नवीन प्रोडक्ट आणण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांचे बरेच कर्मचारी त्यावर दिवस-रात्र काम करत होते. काहींची तर या प्रोडक्टमुळे झोप उडाली आहे, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पण कंपनीच्या ऐन प्रोडक्टच्या जाहिरातीमध्ये चुकीची माहिती प्रसारित झाल्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. कारण सध्या अर्ध्याहून अधिक जग गुगलच्या विविध सेवांचा वापर करत आहे आणि सेवा वापरताना ते कंपनीवर विश्वास ठेवत आहेत. त्यात ऐनवेळी त्यांच्या प्रोडक्टच्या जाहिरातीमध्ये चुकीची माहिती आल्यामुळे कंपनीच्या त्या प्रोडक्टबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण झाली. त्याचा थेट परिणाम कंपनीच्या शेअर्सवर दिसून आला. यामुळे गुगलच्या पॅरेंट कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
Microsoft चे शेअर्समध्ये 3 टक्क्यांची वाढ
Alphabet ने ट्विटरवर Bard च्या जाहिरातीबाबत एक छोटा GIF व्हिडिओ पोस्ट केला होता. या जाहिरातीमध्ये Bard एक कठीण प्रश्नाचे उत्तर सहज देईल, असे वाटत होते. पण झाले उलट. बार्डकडून त्यावेळी चुकीचे उत्तर देण्यात आले. या चुकीच्या उत्तराच्या बातमीचा परिणाम Albhabetच्या शेअर्सवर झाला. तर दुसरीकडे Microsoft कंपनीच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले.
Alphabet ने केलेली जाहिरात काय होती?
जाहिरातीमध्ये, Bard ला काही प्रश्न विचारण्यात आले होते. जसे की, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST) द्वारे केलेले कोणते नवीन शोध मी माझ्या 9 वर्षांच्या मुलाला सांगू शकतो? या प्रश्नावर Bard ने अनेक उत्तरे दिली. त्यात JWST चा उपयोग पृथ्वीच्या सौरमालेच्या बाहेरील ग्रह किंवा एक्सोप्लॅनेट्सची पहिली छायाचित्रे घेण्यासाठी करण्यात आला होता, अशी माहिती सुद्धा देण्यात आली होती. पण NASA कडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, एक्सोप्लॅनेटची पहिली छायाचित्रे 2004 मध्ये युरोपियन सदर्न ऑब्झर्व्हेटरीच्या व्हेरी लार्ज टेलिस्कोपने (VLT) घेतली होती.
आर्टीफिशिअल इंटेलिजन्सच्या दुनियेत पुढे काय-काय होईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. जगातील दोन मोठ्या कंपन्या या स्पर्धेत एकमेकांना टक्कर येत आहेत; त्यामुळे येणाऱ्या काळात आर्टीफिशिअल इंटेलिजन्सला घेऊन टेक्नॉलॉजीकल वॉर होण्याची शक्यता दिसून येत आहे.