अमेरिकेतील वाढती महागाई आणि भविष्यात फेडरल रिझर्व्हकडून होणारी व्याजदर वाढ या पार्श्वभूमीवर कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण सुरुच आहे. आज शुक्रवारी 17 फेब्रुवारी 2023 एमसीएक्सवर सोन्याचा भाव 400 रुपयांनी कमी झाला तर चांदी तब्बल 1100 रुपयांनी स्वस्त झाली. मागील महिनाभरातील सोने आणि चांदीचा हा सर्वात कमी दर आहे.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 55827 रुपये इतका खाली आला आहे. त्यात 401 रुपयांची घसरण झाली. तत्पूर्वी इंट्रा डेमध्ये सोन्याचा भाव 55691 रुपयांच्या स्तरापर्यंत खाली घसरला होता. एमसीएक्सवर एक किलो चांदीचा भाव 64480 रुपये इतका खाली आला असून त्यात 1153 रुपयांची घसरण झाली. तीन सत्रात सोन्याचा भाव जवळपास 1200 रुपयांनी स्वस्त झाला आहे. गुरुवारी सोने 56228 रुपयांवर स्थिरावले होते. बुधवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव 56126 रुपयांवर बंद झाला होता. चांदीमध्ये 200 रुपयांची घसरण झाली होती.
Goodreturns या वेबपोर्टलनुसार आज शुक्रवारी मुंबई सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 51800 रुपये इतका आहे. त्यात गुरुवारच्या तुलनेत 200 रुपयांची घसरण झाली. 24 कॅरेटचा भाव 56510 रुपये इतका आहे. त्यात 220 रुपयांची घसरण झाली. पुण्यात आज सोने 200 रुपयांनी स्वस्त झाले आहे. 22 कॅरेटचा भाव 51800 रुपये असून 24 कॅरेटचा भाव 56510 रुपये इतका आहे.
राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 51950 रुपये इतका खाली आहे. त्यात 200 रुपयांची घसरण झाली. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 56660 रुपये इतका खाली आला आहे. त्यात गुरुवारच्या तुलनेत 220 रुपयांची घसरण झाली. चेन्नईत आज सोने 300 रुपयांनी स्वस्त झाले. 22 कॅरेट सोन्याचा भाव 52500 रुपये इतका आहे. त्यात 300 रुपयांची घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याचा प्रती 10 ग्रॅमचा दर 57230 रुपये इतका असून त्यात गुरुवारच्या तुलनेत 370 रुपयांची घसरण झाली. बुधवारी चेन्नईत सोने 380 रुपयांनी स्वस्त झाले होते. कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 51800 रुपये आहे. 24 कॅरेटचा भाव 56510 रुपये इतका असून सोनं 440 रुपयांनी स्वस्त झाले.
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज शुक्रवारी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 56175 रुपये इतका आहे. 23 कॅरेटचा दर 55950 रुपये असून 18 कॅरेट सोन्याचा भाव 51456 रुपये इतका आहे. एक किलो चांदीचा भाव 64500 रुपये इतका आहे.
जागतिक कमॉडिटी बाजारात आज स्पॉट गोल्डचा भाव 0.3% ने घसरला. तो 1832.42 डॉलर प्रती औंस इतका झाला. यूएस गोल्ड फ्युचर्सचा भाव 1850 डॉलरखाली आला आहे. चांदीचा भाव 21 डॉलर प्रती औंस इतका आहे. यापूर्वी बुधवारच्या सत्रात सोन्याचा भाव 1830 डॉलरपर्यंत खाली आला होता. मागील महिनाभरातील सोने दराची नीचांकी पातळी आहे. सोन्यामधील घसरणीने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे. जानेवारी महिन्यात सोन्याचा भाव 3% ने वाढला होता. वर्ष 2022 मध्ये सोन्याने गुंतवणूकदारांना दुहेरी आकड्यात रिटर्न दिले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर भू राजकीय संघर्ष आणि मंदीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल होता. मात्र फेब्रुवारी पहिल्या पंधरवड्यात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली.
सोन्यातून मिळणारे रिटर्न फिके पडले
सोन्याच्या किंमतीवर आणखी काहीकाळ दबाव राहील, असा अंदाज कमॉडिटी विश्लेषक व्यक्त करत आहेत. कामा ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक कोलीन शाहा यांच्या मते अमेरिकेतील महागाईने फेडरल रिझर्व्हला पुन्हा एकदा व्याजदर वाढवण्यास संधी मिळेल. डॉलर इंडेक्स वधारल्याने सोन्याची खरेदी महागली आहे. बॉंड यिल्ड आणि बँकांचे व्याजदर वाढल्याने सोन्यातून मिळणारे रिटर्न फिके पडले. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत सतत घसरण होत असल्याचे दिसून येते, असे शाहा यांनी सांगितले. भारतात देखील महागाई वाढत असल्याने रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर वाढवण्याची शक्यता वाढली आहे. नजीकच्या काळात एमसीएक्सवर सोन्याचा भाव 56800 ते 57200 रुपयांच्या दरम्यान राहील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने 1960 ते 1980 डॉलरच्या दरम्यान राहील, असा अंदाज आहे.