भारतातील कमोडीटी मार्केटमध्ये गेल्या दहा वर्षांपासून अनेक बदल झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे सोन्याचा भाव दहा वर्षात दुपटीहून अधिक वाढला आहे. जागतिक बाजारपेठेत होत असलेले चढ-उतार आणि अनेक गोष्टी यास कारणीभूत आहेत. तरीही भारत हा जगभरात सोने खरेदी करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारतात अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्याला अत्यंत शुभ मानले जाते. यादिवशी सोने बाजारात मोठी उलाढाल होत असते. काही जणांची अशी धारणा आहे की, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेल्या गुंतवणुकीत दिवसेंदिवस वाढ होते. त्यामुळे परंपरा म्हणून भारतीय अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आवर्जून सोने खरेदी करतात.
10 वर्षांत सोन्याची किंमत दुपटीहून अधिक वाढली
गेल्या दहा वर्षातील सोन्याच्या किमतीचा आलेख पाहता गुंतवणूकदारांसाठी सोन्यातील गुंतवणूक ही फायदेशीर ठरली आहे. 2013 साली 10 ग्रॅम सोन्याची किंमत 26,867 रुपये होती. ती 17 सोमवारपर्यंत (17 एप्रिल, 2023) 62,470 रुपयांवर पोहोचली आहे. सोन्याची किंमत या कालावधीत दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे. दहा वर्षात प्रत्येक वर्षी सोन्याच्या दरात हालचाल बघायला मिळाली आहे. 2013 ते 2023 या वर्षात सोन्याच्या किमतीत खालीलप्रमाणे वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
2015 साली नकारात्मक परतावा
2015 मध्ये सोन्याच्या किमती कमी झाल्या आणि 11.20% नकारात्मक परतावा दिला कारण याकाळात जागतिक अर्थव्यवस्थेत स्थिरता दिसून आली. तसेच 2020 मध्ये, सोने चकाकले आणि 46.04% परतावा दिला आहे. 2020 मध्ये सोन्याच्या मूल्यात इतक्या तीव्र वाढीची कारणे म्हणजे रोखे उत्पन्नातील घट, कोरोनाव्हायरसचा उद्रेक आणि अर्थव्यवस्थेतील कमी व्याजदर यासह अनेक कारणे होती.
अडचणीच्या काळातील गुंतवणुकीचा `सुवर्ण`मार्ग
सोन्याला जगभरात सर्व पातळीवर विश्वासार्ह धातू म्हणून मान्यता आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात सोने तारण ठेवून त्याचा सर्रास वापर केला जातो. कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकरीवर गदा आली होती. त्यावेळी भारतीयांनी सोने गहाण ठेवून त्यातून आपली आर्थिक गरज पूर्ण केली होती. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक ही नेहमीच विश्वासार्ह गुंतवणूक मानली जाते. परिणामी सोन्याच्या किमतीने गेल्या 10 वर्षांत मोठा टप्पा पार केला आहे. या 10 वर्षात सोन्याच्या किमतीत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.