गतवर्षी कमोडिटीतील मोठ्या वाढींसाठी तसेच घसरणींसाठी डॉलर केंद्रस्थानी राहिला आहे. डॉलरची ताकद व कमॉडिटी यांच्यातील व्यस्त सहसंबंध हा गेल्या अनेक दशकांपासून नियम झाल्यासारखा आहे. दोन वर्षे सलग भक्कम राहिलेल्या अमेरिकी डॉलर निर्देशांकात (डीएक्सवाय), प्रत्यक्ष व अपेक्षित दर फरक सातत्याने वाढत असूनही, नुकतीच तीव्र घसरण झाली आहे. 2023 मध्ये डॉलर घसरतच राहिला. कमकुवत डॉलर व वाढत्या कमॉडिटी यांच्यातील व्यस्त सहसंबंध आपल्याला दिसून येईल आणि सोने व चांदी या सहसंबंधांचे सर्वांत मोठे लाभार्थी ठरतील असे मत एंजल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी व्यक्त केले.
वर्ष 2023मध्ये सोन्याचे दर प्रति तोळा 58000 रुपयांवर जातील असा अंदाज प्रथमेश माल्या यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये सोन्याचे दर 2100 डॉलर्स प्रति औंस होण्याची शक्यता आहे. ज्यांना सोन्याच्या खरेदीतून मूल्यनिर्मिती करायची आहे त्यांच्यासाठी 48000-50000 प्रति दहा ग्रॅम श्रेणीतील सोने खरेदी करणे व जमवून ठेवणे हा पर्याय ठरू शकतो. दरवाढीनुसार भावनेच्या भरात खरेदी करण्यापेक्षा गुंतवणूकदारांनी धोरणीपणे प्रत्येक टप्प्यावर सोने खरेदी करून जमवून ठेवावे असा सल्ला त्यांनी गुंतवणूदारांना दिला.
एकंदर, 2022 हे वर्ष रोलर कोस्टर राइडसारखे ठरले, नेमके काय होणार आहे.याबद्दल कोणालाच अंदाज बांधता आला नाही. मात्र, 2023 मध्ये, प्रमुख बाजारांमध्ये मंदीची शक्यता असल्यामुळे 2022 मधील इक्विटी व कॉर्पोरेट रोख्यांची निकृष्ट कामगिरी पुढे तशीच सुरू राहील अशी शक्यता आहे. याउलट सोने संरक्षण पुरवू शकते, कारण मंदीच्या काळात सोन्याची कामगिरी चांगली होते. गेल्या सातपैकी पाच मंदींच्या काळात सोन्याची कामगिरी सकारात्मक राहिली आहे. म्हणूनच, 2023 मध्ये सोने 10% हून अधिक परतावा मिळवून देईल, अशी अपेक्षा आपण ठेवू शकतो.