सणासुदीचा हंगाम सरल्यानंतर सोन्याची चमक फिकी पडली आहे. आज सोमवारी 31 ऑक्टोबर 2022 रोजी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅमचा भाव 50,200 रुपयांपर्यंत खाली घसरला. मागील महिनाभरातील सोन्याचा सर्वात कमी दर आहे. भारतीय बाजारांप्रमाणेज जागतिक पातळीवर देखील सोन्याचा भाव कमी झाला आहे. (Gold Price near one month low)
सोन्याचा भाव मागील काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहे. अमेरिकेतील महागाई कमी करण्यासाठी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढ करण्यात आली होती. फेडरल रिझर्व्हच्या या आक्रमक भूमिकेने डॉलरचे मूल्य भक्कम झाले. त्याशिवाय बॉंड मार्केटमध्ये तेजी दिसून आली. याचा परिणाम कमॉडिटी बाजारावर झाला. सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे दिसून आले.
या आठवड्यात फेडरल रिझर्व्हची बैठक होणार आहे. फेडरल रिझर्व्ह आगामी पतधोरण बैठकीत व्याजदर दरवाढीबाबतची भूमिका सौम्य करेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. आज वर्ल्ड कमॉडिटी मार्केटमध्ये सोन्याचा भाव प्रती औंस 1,643.13 डॉलर इतका होता. त्यात महिनाभरात 1% घसरण झाली. चांदीचा भाव प्रती औंस 19.16% डॉलर इतका होता. त्यात 0.4% घसरण झाली.
भारतीय बाजारात MCX वर इंट्रा डेमध्ये आज सोने प्रती 10 ग्रॅमसाठी 50,161 रुपयांपर्यंत खाली घसरले होते. सध्या सोन्याचा भाव 50,376 रुपये इतका आहे. एक किलो चांदीचा भाव 57,540 रुपये इतका आहे. इंट्रा डेमध्ये चांदीचा भाव 57,799 रुपये इतका वाढला होता. मार्च महिन्यात सोन्याचा भाव 55,000 रुपये इतका वाढला होता. त्यानंतर जगभरातील नकारात्मक घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतीत घसरण झाली. सलग सातव्या महिन्यात सोने दरात घसरण झाली आहे.