कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतींवर दबाव कायम आहे. आज मंगळवारी 21 फेब्रुवारी 2023 रोजी मल्टी कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीला नफा वसुलीचा फटका बसला. आज सोन्याचा भाव 110 रुपयांनी कमी झाला. सध्या एमसीएक्सवर सोन्याचा भाव 56171 रुपयांवर आहे. चांदीचा भाव 65572 रुपये असून त्यात 280 रुपयांची घसरण झाली. काल सोमवारी सोने आणि चांदी महागले होते. (Gold and Silver Price Fall Today )
आज सकाळच्या सत्रात एमसीएक्सवर सोने आणि चांदीच्या किंमतींवर दबाव दिसून आला. सध्या दुपारी 12.40 मिनीटांनी 10 ग्रॅम सोन्याचा भाव56140 रुपये इतका आहे. त्यात 73 रुपयांची घसरण झाली. तत्पूर्वी इंट्रा डेमध्ये सोन्याचा भाव 56104 रुपयांपर्यंत खाली घसरला होता. सोमवारी सोने 56213 रुपयांवर बंद झाले होते. एक किलो चांदीचा भाव 65511 रुपये असून त्यात 238 रुपयांची घसरण झाली आहे. इंट्राडेमध्ये चांदीचा भाव 65486 रुपयांपर्यंत खाली गेला होता.
देशभरातील प्रमुख सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली. Goodreturns या वेबपोर्टलनुसार आज मंगळवारी मुंबई सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 52000 रुपये इतका आहे. त्यात सोमवारच्या तुलनेत 100 रुपयांची घसरण झाली. सोमवारी देखील सोने 100 रुपयांनी स्वस्त झाले होते. 24 कॅरेटचा भाव 56730 रुपये इतका आहे. त्यात 100 रुपयांची घसरण झाली. पुण्यात आज 22 कॅरेटचा भाव 52000 रुपये असून 24 कॅरेटचा भाव 56730 रुपये इतका आहे.
राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 52150 रुपये इतका असून 24 कॅरेट सोन्याचा भाव 56880 रुपये इतका आहे. त्यात सोमवारच्या तुलनेत 120 रुपयांची घसरण झाली. चेन्नईत आज सोने 100 रुपयांनी स्वस्त झाले. 22 कॅरेट सोन्याचा भाव 52700 रुपये इतका आहे.24 कॅरेट सोन्याचा प्रती 10 ग्रॅमचा दर 57500 रुपये इतका आहे. कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 52000 रुपये आहे. 24 कॅरेटचा भाव 56730 रुपये इतका असून सोनं 100 रुपयांनी स्वस्त झाले.
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज मंगळवारी 21 फेब्रुवारी 2023 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 56447 रुपये इतका आहे. 22 कॅरेटचा दर 56221 रुपये असून 18 कॅरेट सोन्याचा भाव 42335 रुपये इतका आहे. एक किलो चांदीचा भाव 65629 रुपये इतका आहे.
स्पॉट गोल्डचा भाव घसरला (Spot Gold Price Fall)
फेडरल रिझर्व्हची बैठक, डॉलर इंडेक्समध्ये तेजी, अमेरिका आणि चीनमधील संघर्ष, अमेरिकेची युक्रेनला आर्थिक मदत यासारख्या घडामोडींचे जागतिक कमॉडिटी बाजारावर परिणाम होत आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात सोने धातूला नफा वसुलीचा फटका बसला आहे. अमेरिकेतील महागाई वाढत आहे. त्यातच डॉलरचे मूल्य इतर चलनांच्या तुलनेत वाढल्याने डॉलर इंडेक्स मजबूत झाला आहे. परिणामी आज फेडरल रिझर्व्हकडून आणखी व्याजदर वाढवले जातील, असे भाकीत करण्यात आले आहे. आज सकाळच्या सत्रात स्पॉट गोल्डचा भाव 1837 डॉलर प्रती औंस इतका खाली आला आहे. पाच आठवड्यातील ही नीचांकी पातळी आहे. स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा भाव 1843.75 डॉलर या पातळीव खुला झाला होता.
सोन्याच्या किंमतींबाबत काय आहे तज्ज्ञांचा अंदाज (Gold Outlook)
- आयआयएफएल सिक्युरिटीज या संस्थेने एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतींबाबत अंदाज व्यक्त केला आहे.
- आयआयएफएल सिक्युरिटीजनुसार नजीकच्या काळात सोन्याचा भाव 56700 ते 57200 रुपयांच्या दरम्यान राहील.
- आज फेडरल रिझर्व्हची बैठक होणार आहे. त्यात बँकेकडून किमान 0.25% ने व्याजदर वाढवला जाण्याची शक्यता आहे.
- व्याजदर वाढ झाल्यास सोने दराल 1830 डॉलर प्रती औंस इतक्या पातळीवर सपोर्ट असेल, असे आयआयएफएलने म्टले आहे.
- वर्ल्ड मार्केटमध्ये सोने धातूला 1840 च्या पातळीवर टीकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागेल.