Goat Farming: पशुपालन, शेणखताचा व्यवसाय म्हटलं की अनेक जण नाक मुरडतात. पण जनावरांची माणसांप्रमाणेच काळजी घ्यावी लागते. एखादा रोग आला की, जनावरे दगावतात. त्यामुळे अनेकजण या व्यावसायाच्या फंद्यात पडत नाहीत. अनेकदा पशुपालन व्यवसायामुळे शेजारी किंवा इतरांनाही त्रास होतो. त्यामुळे या व्यावसायात खूप कमी लोक उतरत आहेत.
Table of contents [Show]
सीआरपी आणि शेळीपालक दुहेरी भूमिका
काटोल तालुक्यातील राजणी येथे राहणाऱ्या माधुरी तागडे या सगळ्यांना अपवाद आहे. माधुरी यांचे शिक्षण केवळ 12 वी पर्यंत झालेले आहे. त्या उमेद संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांकरिता सीआरपी म्हणून कार्य करतात. हे कार्य करीत असताना त्यांना पंचायत समितीमधून शेळी पालन व्यवसायाबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी शेळीपालन हा व्यवसाय करण्याचा निर्धार केला. अनेक अडचणी आल्या तरी त्या डगमगल्या नाही. आज त्या आनंदाने हा व्यवसाय करीत आहेत आणि त्यातून नफासुद्धा मिळवत आहेत.
बचत गटामधून घेतले कर्ज
सर्वप्रथम माधुरी यांनी महात्मा ज्योतिबा फुले बचत गटामधून 1 लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि 2018 पासुन या व्यवसायाला सुरुवात केली. सगळ्यात आधी त्यांनी 10 गर्भवती शेळ्या विकत घेतल्या. एक वर्षात त्या 10 शेळ्यांनी 20 कोकरांन जन्म दिला. तर दुसऱ्या वर्षात आणखी 20 कोकरं जन्माला आली. अशाप्रकारे माधुरी यांच्याकडे एकूण 50 शेळ्या झाल्या. सुरुवातीची त्यांची दोन वर्ष परीक्षा घेणारी होती. यात काही कोकरांचा मृत्यूसुद्धा होतो. त्याचे नुकसान सहन करावे लागते, असे माधुरी सांगतात.
कशी घेतली जाते काळजी?
10 शेळ्यांपासुन आणखी 40 शेळ्यांची भर पडल्याने माधुरी यांचा काम करण्याचा उत्साह वाढला. त्यामुळे त्यांनी आणखी 25 शेळ्या विकत घेतल्या. असे करता करता त्यांच्याकडे एकूण 100 शेळ्यांची संख्या झाली. या शेळ्यांना ठेवण्यासाठी त्यांनी 45 बाय 55 असे शेड उभारले. प्रत्येक शेळीला त्यांच्या गरजेप्रमाणे वेगवेगळे ठेवण्यात येते. जसे गर्भवती असलेल्या शेळ्यांना वेगळ्या ठिकाणी, कुपोषित कोकरांना वेगळ्या ठिकाणी तर आजारी शेळ्यांना वेगळे ठेवावे लागते.
3 वर्षात तीन लाखांचा नफा
2021 मध्ये माधुरी यांनी ईद आणि होळीला 20 बोकड विकले. या बोकडांना विशेषत: ईद आणि होळीसाठी तयार करण्यात आले होते. त्यामुळे एक बोकड 30 हजार रुपयांमध्ये विकला गेला. 2018 पासून ते 2021 पर्यंत संपूर्ण 3 वर्षात शेळीपालनासाठी 3 लाख रुपये खर्च आला होता. त्यामध्ये जनावरांसाठी उभारण्यात येणारे शेड, चारा, पाणी, डॉक्टर, औषध, वॅक्सीन, प्रोटीनयुक्त पदार्थ खाऊ घालणे या सगळ्या गोष्टींचा समावेश होता. त्यानंतर माधुरी यांनी आता जणांना शेळ्यांकडे लक्ष ठेवण्यासाठी कामावर ठेवले.
वर्षाला 2 लाखांचा नफा
शेळी पालनाचा वर्षाला येणारा 60 हजार रुपये खर्च वगळता. आता वर्षाला दीड ते 2 लाख रुपये नफा होतो, असे त्या सांगतात. शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगला आहे. केवळ आपण जशी आपल्या घरातील लहान मुलांची काळजी घेतो, तशीच काळजी या शेळ्यांची घ्यावी लागते. सतत जातीने त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागते. आम्ही शेळीचे दूध काढत नाही. ते पिल्लांच्याच उपयोगात आणतो. कुपोषित पिल्लांना या दूधाचा लाभ होतो. भविष्यात लेंडी खताचा प्रकल्प हाताशी घ्यायचा आहे आणि त्यासाठी प्रशिक्षण घ्यायचे आहे, अशी इच्छा माधुरी यांनी व्यक्त केली.