सध्या गो फर्स्ट एअरलाइन्स मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. ही कंपनी दिवाळखोरीत निघाली असून त्यावर सध्या कारवाई सुरु आहे. अशातच एका पाठोपाठ एक सगळी उड्डाणे कंपनीने बंद केलेली आहेत. पायलट आणि इतर स्टाफचा पगार देखील कंपनीला देता येत नाहीये. अशातच गो फर्स्ट एअरलाइन्सने त्यांची उड्डाण सेवा 22 जून 2023 पर्यंत ठप्प राहणार असल्याची माहिती दिली आहे.
स्वतः गो फर्स्ट एअरलाइन्सने त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया खात्यावरून ही माहिती दिली गेली आहे. Go First ने एका निवेदनात म्हटले आहे की, "ऑपरेशनल कारणांमुळे 22 जून 2023 पर्यंत Go First फ्लाइट सेवा रद्द करण्यात आल्याबद्दल आम्हाला खेद वाटतो आहे, गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत." कंपनीने ग्राहकांना 1800 2100 999 वर कॉल करण्याचा किंवा कोणत्याही प्रकारच्या सहाय्यासाठी किंवा फीडबॅकसाठी feedback@flygofirst.com वर मेल करण्याचा सल्ला दिला आहे.
Due to operational reasons, Go First flights until 22nd June 2023 are cancelled. We apologise for the inconvenience caused and request customers to visit https://t.co/FdMt1cRjeD for more information. For any queries or concerns, please feel free to contact us. pic.twitter.com/BuKj9YvrSo
— GO FIRST (@GoFirstairways) June 19, 2023
3 मे पासून बंद आहेत उड्डाणे
गो फर्स्टची फ्लाइट सेवा रद्द होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 3 मे पासून सातत्याने कंपनीकडून उड्डाणे रद्द करत असल्याची घोषणा करण्यात येते आहे. या दरम्यान ज्या ज्या नागरिकांनी आगाऊ बुकिंग केले आहे, अशांना त्यांची रक्कम परत दिली जाणार असल्याचे देखील कंपनीने म्हटले आहे.
प्रवाशांना आपले तिकीट रद्द करून परत पैसे, म्हणजेच रिफंड मिळवण्यासाठी आधी देखील खूप त्रास सहन करावा लागला होता. एकाचवेळी अनेक लोक वेबसाईटवर आल्यामुळे GoFirst वारंवार डाऊन होत होती. यावर उपाय म्हणून Go First ने रिफंडसाठी नवीन वेबसाईटही सुरू केली आहे. https://bit.ly/3MPFlwf या लिंकवर क्लिक करून ग्राहक रिफंडसाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
11463 कोटींची थकबाकी
'गो फर्स्ट' ही विमान कंपनी आता दिवाळखोरीत निघाली आहे. याचे कारण म्हणजे बँकेने वेगवेगळ्या बँकांकडून एकूण 11463 कोटींचे कर्ज घेतलेले आहे असून आता कंपनी कर्जाची परतफेड करण्याच्या परिस्थितीत नाहीये. दिवाळखोरीच्या याचिकेनुसार कंपनीवर बँक ऑफ बडोदाचे 1300 कोटी, आयडीबीआय बँकेचे 50 कोटी आणि सेंट्रल बँकेचे 2000 कोटींचे कर्ज देणे बाकी आहे. वेळोवेळी मुदत देऊन सुद्धा कंपनीला हे कर्ज परत फेडता आलेले नाहीये. त्यामुळे राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (NCLT) कंपनीवर दिवाळखोरीचा ठपका ठेवला आणि कारवाईला सुरुवात केली आहे.