संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचे सावट असताना, मोठमोठ्या कंपन्या कर्मचारी कपात करत असताना भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार नाही असं स्पष्ट मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी मांडले आहे.
भारतीय बँका सध्या सुस्थितीत असून त्या योग्य प्रकारे कामगिरी करत असल्याचे देखील दास यांनी म्हटले आहे. आरबीआय संचालित कॉलेज ऑफ सुपरवायझर्सच्या एका जागतिक परिषदेत शक्तीकांत दास यांनी हे मत व्यक्त केले. जगभरात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत, त्यामुळे जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था देखील प्रभावित होते आहे. परंतु या सगळ्या जागतिक घडामोडींचा भारतीय बँकिंग व्यवस्थेवर परिणाम झालेला दिसत नाही असे ते म्हणाले.
अमेरीका-युरोपमधील बँका संकटात
अमेरिकेतील प्रमुख 16 बँकांपैकी एक असलेली सिलिकॉन व्हॅली बँक काही दिवसांपूर्वी दिवाळखोरीत निघाल्याचा उल्लेख देखील शक्तीकांत दास यांनी केला. तसेच अमेरिकेसोबत युरोपातील मोठमोठ्या बँका देखील अस्थिरतेचा सामना करत आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली. अमेरिका आणि युरोपात अशी आर्थिक परिस्थिती असताना भारतात मात्र त्याचा परिणाम पाहायला मिळाला नाही असे ते म्हणाले. भारतीय बँका आर्थिक शिस्तीने काम करत असल्यामुळे असे घडले आहे असेही ते म्हणाले.
Indian banks have stayed resilient and bad loans have fallen substantially, according to RBI Governor Shaktikanta Das https://t.co/voVNrp53Y1
— Bloomberg Economics (@economics) April 27, 2023
तणाव चाचणीत भारतीय बँका उत्तीर्ण
आर्थिक संकटाच्या काळात भारतीय बँका तग धरू शकतात हे जाणून घेण्यासाठी काही महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक अभ्यास केला होता. या पाहणीत भारतीय बँका उत्तीर्ण ठरल्या असून आर्थिक संकटातही त्या तग धरून राहू शकतात असे RBI ने स्पष्ट केले होते. यामुळेच जागतिक आर्थिक मंदीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही याची खात्री शक्तीकांत दास यांनी व्यक्त केली आहे.
छोट्या गुंतवणूकदारांवर बँकांना विश्वास
भारतीय बँका छोट्या आणि स्थानिक ठेवीदारांवर अवलंबून असतात जे जास्त बचत करतात आणि कमी कर्ज घेतात. याउलट, 85% अमेरिकन नागरिक क्रेडिट कार्ड वापरतात, ज्यामुळे कर्जाच्या सापळ्यात अडकण्याची त्यांची शक्यता वाढते.भारतात मात्र केवळ 5% लोक क्रेडिट कार्ड वापरतात. भारतीय नागरिक मात्र बचतीवर जास्त विश्वास ठेवतात असे एका अहवालात म्हटले आहे.
भारतीय बँकांच्या नॉन-परफॉर्मिंग असेट्स (NPA) सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहेत आणि इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च (Ind-Ra) नुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँका उत्तम कामगिरी करत असून त्यांच्याकडे पुरेसे भांडवल देखील आहे आणि त्यांना भांडवलासाठी सरकारवर अवलंबून राहण्याची गरज नाही असे स्पष्ट केले गेले आहे.
या सर्व गोष्टींचा प्रभाव थेट भारतीय अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळतो आहे. भारतीय नागरिकांची बचतीची सवय आणि भारतीय बँकांची आर्थिक शिस्त यामुळे जागतिक आर्थिक संकटाच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्था तग धरून आहे.