आजच्या काळात अनेक प्रकारची क्रेडिट कार्ड बाजारात उपलब्ध आहेत. प्रत्येक गरजेनुसार क्रेडिट कार्ड आहे. पेट्रोल, चित्रपट, खाण्यापिण्यासाठी, प्रवासासाठी आणि खरेदीसाठी... प्रत्येक वर्गासाठी क्रेडिट कार्ड सध्या उपलब्ध आहे. या सर्व क्रेडिट कार्डांवर कॅशबॅक (Cashback), रिवॉर्ड पॉइंट्सचे (Reward points) फायदे मिळतात. अशा परिस्थितीत प्रत्येकानं काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकता.
1. गरजेनुसार कार्ड घ्यावं
प्रत्येक प्रकारच्या गरजांसाठी काही ना काही क्रेडिट कार्डची सुविधा असतेच. अशा स्थितीत क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी तुम्ही कोणत्या कामासाठी जास्त खर्च करता, ते आधी पाहावं. त्यानंतर त्यानुसारच क्रेडिट कार्ड घ्यावं. यामुळे तुम्हाला फायदा जास्त होईल. समजा प्रवासासाठी खूप खर्च येत असेल तर पेट्रोल किंवा ट्रॅव्हल कार्ड घ्यावं. जर शॉपिंगची आवड असेल तर शॉपिंग कार्ड घ्यावं. यामुळे तुम्ही त्या कार्डवर अधिक रिवॉर्ड पॉइंट मिळवू शकाल. समजा तुम्ही कपडे खरेदी केले किंवा ट्रॅव्हल कार्डमध्ये पेट्रोल भरलं तर तुम्हाला त्याचा कमी फायदा होणार आहे.
2. रिवॉर्ड पॉइंट्सचा खेळ समजून घ्या
क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात, सर्वांनाच माहीत आहे. मात्र अनेकांना हे माहीत नसतं, की रिवॉर्ड पॉइंट वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवहारांवरही वेगळ्या पद्धतीनं मिळत असतात. जसं की जेवणावर 100 रुपये खर्च केल्यास तुम्हाला 10 रिवॉर्ड पॉइंट मिळू शकतात, तर इतर गोष्टींवर तुम्हाला प्रत्येक 100 रुपयांसाठी फक्त 2 रिवॉर्ड पॉइंट मिळू शकतात. रिवॉर्ड पॉइंट्स कुठे जास्त मिळतात, हे तुम्हाला आधीच माहीत असायला हवं, त्यामुळे तुमचा बहुतांश खर्च क्रेडिट कार्डनं होईल आणि तुम्हाला रिवार्ड पॉइंट्स मिळतील.
क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी, रिवॉर्ड पॉइंटच्या बदल्यात तुम्हाला काय मिळतं, हेदेखील जाणून घ्यावं. काही बँका 4 रिवॉर्ड पॉइंट्सवर 1 रुपये देतात, तर काहींचं गणित वेगळं असू शकतं. काही केवळ रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्यासाठी खरेदीचा पर्याय देतात, ते पैसे देत नाहीत. तर जे रिवॉर्ड पॉइंट्सच्या बदल्यात पैसे देतात, ते त्यासाठी पैसेदेखील आकारतात.
3. आगामी सणांच्या ऑफरकडे लक्ष द्या
क्रेडिट कार्डचा खरा फायदा हा सणासुदीच्या डीलमध्ये होत असतो. या दरम्यान तुम्हाला कार्डनं केलेल्या खरेदीवर 5 टक्के, काहींकडून 10 टक्के आणि काहींकडून तर 15-20 टक्के सूट किंवा कॅशबॅक मिळू शकतो. अशावेळी या क्रेडिट कार्डच्या मदतीनं तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू अतिशय स्वस्तात मिळू शकतात. नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही उपलब्ध असतो. याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. या ऑफर्स कमी कालावधीसाठी असतात, त्यामुळे वेळेत त्यांचा लाभ घेणं फायद्याचं ठरतं.