राज्यातील जनतेला आता स्वस्तात औषधे खरेदी करता येणार आहेत. राज्य शासनाने आता राज्यातील सार्वजनिक रुग्णालय परिसरात जेनेरिक औषधालये(Generic medicine stores) सुरू करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नॅकोफ इंडिया लिमिटेड (NACOF) यांच्याशी करार केला आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना स्वस्तात औषध उपलब्ध होणार आहेत.
24 तास सुरू राहणार जन औषधी केंद्र
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून NACOF या संस्थेला संपूर्ण राज्यभरातील सर्व सार्वजनिक रुग्णालय परिसरामध्ये अशा प्रकारची मेडिकल सुरू करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी राज्य सरकारकडून मेडिकल साठी 250 स्केअर फुटापर्यंतची जागा 20 वर्षाच्या भाडेकरारावर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे वृत्त हिंदुस्थान टाईम्सने दिले आहे. या करारानुसार आता सार्वजनिक रुग्णालयांच्या ठिकाणी 24 तास जेनेरिक रुग्णालये सुरु राहणार आहेत.
स्वस्तात मिळणार औषधे
जेनेरिक मेडिकलमध्ये ब्रँडेड औषध कंपन्याच्या तुलनेत स्वस्त दरातील जेनेरिक औषधे विकली जाणार आहेत. या मेडिकलमधून नागरिकांना जवळपास 10 ते 70 टक्क्यांनी औषधे स्वस्तात उपलब्ध होणार आहेत. तसेच जर एखाद्यावेळी संबंधित औषधे उपलब्ध नसतील तर अशा वेळी ब्रँडेड कंपन्याची औषधे ग्राहकांना विकण्याची परवानगी या मेडिकल्स देण्यात आली आहे. मात्र, या औषधावर जन औषध केंद्रांना 5 टक्केपर्यंतचा डिस्कॉउंट द्यावा लागणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सर्व सामान्य जनतेचा औषधावर होणाऱ्या खर्चात बचत होणार आहे.
सर्व प्रकारचे उपचार मोफत-
दरम्यान, राज्य शासनाकडून गेल्याच आठवड्यात राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये सर्व प्रकारचे उपचार मोफत केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. रुग्णांच्या उपचारासाठी येणारा खर्च राज्य सरकारकडून करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.