LGBTQIA+ समुदायातल्या सदस्यांसाठी एक महत्वाची बातमी आलीये. फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (FGII) ने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या LGBTQIA+ समुदायातल्या नागरिकांना आरोग्य विमा उपलब्ध करून देण्याची योजना आणली आहे. भारतात कलम 377 रद्द केल्यानंतर समलैंगिकतेला गुन्ह्याच्या कक्षेबाहेर ठेवले आहे. देशभरातील समलैंगिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले होते. परंतु कुठलाही विमा घेताना ‘कुटुंब’ या रकान्यात विमाधारकाला कुटुंबाची माहिती द्यावी लागते. म्हणजेच विमा धारकाच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबास विमा सुरक्षेचा आर्थिक फायदा मिळत असतो. समलैंगिक जोडप्यांना अशा प्रकारचे फायदे तांत्रिक कारणामुळे मिळत नव्हते. परंतु कंपनीने सर्वसमावेशक धोरणाचा अवलंब करत त्यांच्या सर्व साधारण विमा योजनेत 'कुटुंब' ची व्याख्या विस्तृत केली आहे.
“LGBTQIA+ समुदायासमोरील आव्हानांबद्दल आम्ही जागरूक आहोत. आमचा विश्वास आहे की LGBTQIA+ समुदाय देखील समाजाचा महत्त्वाचा घटक आहे आणि या समुदायातील व्यक्ती इतर व्यक्तींप्रमाणेच समान संरक्षण सुविधांचा लाभ घेण्याच्या अधिकारास पात्र आहेत. विमा कंपनी म्हणून आमचा असा विश्वास आहे की समाजातील सर्व घटकांना त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडी जपण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी कार्यरत राहणे आमची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे”
-रुचिका मल्हन वर्मा, मुख्य विपणन अधिकारी, फ्यूचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
ही विमा मोहीम सध्या मुंबई, दिल्ली, गुरुग्राम, गोवा आणि बंगळुरू या शहरांमध्ये 1 जानेवारी 2023 पासून सुरू करण्यात आली असून पुढील 3 आठवडे या योजनेचा फायदा लोक घेऊ शकतील, असे कंपनीने जाहीर केले आहे.
या ग्राहकांना FG Health Absolute चा लाभ देखील मिळणार आहे. टेली-समुपदेशन, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरील वेबिनार, वेलनेस सेंटर्स, फिटनेस सेंटर्स, स्पोर्ट्स आणि डायग्नोस्टिक सेंटर अशी सुविधा दिली जाणार आहेत. जननेंद्रियाची पुनर्रचना किंवा लिंग बदलासारख्या शस्त्रक्रिया या योजनेत समाविष्ट केल्या जाणार नाहीत असे देखील स्पष्ट केले गेले आहे.