जर लांबच्या कुठल्या प्रवासाला सहकुटुंब-सहपरिवार जायचा तुम्ही प्लॅन करत असाल आणि त्यासाठी जर तुम्हांला संपूर्ण ट्रेनच बुक करायची असेल तर तुमच्यासाठी हा पर्याय खुला आहे.होय, संपूर्ण ट्रेन बुक करण्याची सोय आता भारतीय रेल्वेने दिली आहे.
या सुविधेद्वारे कोणीही व्यक्ती, संघटना, राजकीय पक्ष ट्रेन बुकिंग करू शकतात. रेल्वेच्या भाषेत बोलायचं झालं तर या सुविधेला फुल टेरिफ रेट (FTR) बुकिंग असं म्हणतात. या योजने अंतर्गत तुम्हांला रेल्वे बुक करता येणार आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही यात कमी-जास्त डबा देखील जोडू शकता. यासाठी काही नियम-अटी तुम्हांला पूर्ण कराव्या लागणार आहेत. चला तर या लेखात जाणून घेऊयात काय आहे ट्रेन बुकिंगची प्रोसेस.
Table of contents [Show]
Full Tariff Rate बुकिंग कसं कराल?
ही सेवा इंडियन रेल्वे देत असल्यामुळे तुम्हांला FTR सेवा मिळवण्यासाठी IRCTC वर जाऊन नोंदणी करावी लागेल. त्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती तुम्हांला द्यावी लागेल. सोबतच
नोंदणीसाठी तुम्हाला देय रक्कम भरावी लागेल.
ऑनलाईन बुकिंग करता येत नसेल तर तुम्ही रेल्वे स्टेशनवर जाऊनही नोंदणी करू शकता.ही नोंदणी 6 महिन्यांसाठी वैध असेल. या ठराविक 6 महिन्यांतच तुम्हांला तुमचा ट्रॅव्हल प्लॅन बनवावा लागेल. मुदत संपल्यानंतर तूम्हाला पुन्हा एकदा नव्याने नोंदणी करावी लागणार आहे.
Online नोंदणी कशी कराल?
IRCTC वेबसाइटद्वारे नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला बुकिंगचा प्रकार, ट्रेनचा कोणता डबा हवा आहे, इतर कुठल्या सुविधा हव्या आहेत, जेवणाचे पर्याय, ब्लॅंकेटची आवश्यकता इत्यादी माहिती द्यावी लागेल.
यानंतर तुम्हाला तुमची FTR विनंती सबमिट करावी लागेल. यानंतर तुम्हाला बुकिंग संदर्भ क्रमांक (Booking Reference Number) मिळेल. तुम्ही मागणी केलेल्या सुविधेनुसार तुम्हाला नोंदणी रक्कम वेबसाईटवर दाखवली जाईल, तितकी रक्कम तुम्हांला जमा करावी लागेल.
Booking Reference Number मिळाल्यापासून पुढील 6 दिवसांच्या आत तुम्हाला नोंदणीची संपूर्ण रक्कम जमा करावी लागेल. यासाठी ऑनलाईन बँकिंगचे पर्याय देखील उपलब्ध आहेत. जर तुम्ही नोंदणी रक्कम 6 दिवसांच्या आत जमा केली नाही, तर तुम्हाला ही प्रक्रिया पुन्हा एकदा करावी लागेल.
Offline नोंदणी कशी कराल?
जर तुम्ही ऑफलाईन नोंदणी करणार असाल तर ज्या स्टेशनवरून प्रवास सुरु करणार आहात, त्या स्टेशनवर जाऊन नोंदणी फॉर्म भरावा लागेल. यासाठी स्टेशनच्या मुख्य बुकिंग सुपरवायझरकडे जाऊन तुम्हांला प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. मुख्य बुकिंग पर्यवेक्षक तुम्ही दिलेली लिखित माहिती IRCTC वर फीड करतील. त्यांनतर तुम्हांला बुकिंगसाठी एक स्लिप दिली जाईल, त्यावर देय रक्कम देखील लिहिलेली असेल. याच स्लिपवर तुमचा Booking Reference Number नमूद केलेला असेल. नमूद केलेली रक्कम तुम्हांला त्याच कार्यालयात भरावी लागेल.
किती डबे बुक करता येतील?
FTR बुकिंग करताना कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 24 ट्रेन डब्यांचे आरक्षण करता येईल. यात 2 गार्ड बॉक्स देखील समाविष्ट आहेत. कोच बुक करण्यासाठी, 7 दिवसांच्या टूरसाठी प्रत्येक कोचसाठी 50,000 रुपये नोंदणी रक्कम भरावी लागेल. जर तुमचा प्रवास 7 दिवसांपेक्षा जास्त असेल तर प्रत्येक कोचमागे अतिरिक्त 10,000 रुपये जमा करावे लागतील. जर तुम्ही 18 डब्यांची ट्रेन बुक करत असाल तर 7 दिवसांच्या प्रवासासाठी 9 लाख रुपये खर्च येईल. 18 पेक्षा अधिक ट्रेनचे डबे तुम्हांला हवे असतील तर प्रत्येक कोचसाठी 50,000 रुपये भरावे लागतील.