Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FTX Collapsed : FTX या क्रिप्टो एक्सचेंजचे मालक सॅम बँकमन - फ्राईड यांच्याविरोधात आता ग्राहकांनीच कोर्टात दावा ठोकला आहे

FTX Exchange

बुडित निघालेलं क्रिप्टो एक्सचेज FTX चे संस्थापक सॅम बँकमन - फ्राईड यांच्याविरोधात अमेरिकन न्यायालयात मनी लाँडरिंग आणि फसवणुकीचे खटले सुरू आहेत. त्यातच आता FTXच्या ग्राहकांनीही संस्थापक बँकमन यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे.

FTX हे जगातलं दुसरं सगळ्यात मोठं क्रिप्टो एक्सचेंज (Crypto Exchange) नोव्हेंबर महिन्यात बुडालं. आणि एक्सचेंजचे संस्थापक सॅम बँकमन - फ्राईडवर (Sam Bankman Fried) अमेरिकेत सध्या फसवणूक, क्रिप्टो घोटाळा (Crypto Scans) आणि मनी लाँडरिंगचे (Money Laundering) खटले सुरू आहेत. त्यातच आता FTX एक्सचेंजच्या ग्राहकांनी सॅम बँकमन आणि इतर मालकांवर खटला दाखल केला आहे. या ग्राहकांना त्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी बँकमन यांच्याकडून भरपाई हवी आहे.     

आणि त्यासाठी एक्सचेंजमध्ये असलेले डिजिटल असेट्स (Digital Assets) ग्राहकांच्या नावावर व्हावेत अशी या ग्राहकांची मागणी आहे. FTX एक्सचेंज आधीच आर्थिक संकटात आहे. आणि कंपनीची नोंदणी बहामाज् बेटांवर असल्यामुळे तिथे कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया (Bankruptcy) सुरू आहे. आणि त्यातच आता डिजिटल असेट्स ग्राहकांना आपल्या नावावर हवे आहेत.     

कंपनीच्या उर्वरित मालमत्तेवर ग्राहकांचा पहिला अधिकार आहे. त्यामुळे ग्राहकांची खाती एकत्र करून आधी त्यांचं नुकसान भरून द्यावं असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. ‘ग्राहकांना इतर गुंतवणूकदार किंवा कर्जादारांबरोबर रांगेत उभं राहावं लागू नये. ग्राहकांचा हक्क पहिला आहे,’ असं ग्राहकांनी केलेल्या याचिकेत म्हटलंय.    

नोव्हेंबरच्या 12 तारखेला FTX एक्सचेंजने दिवाळखोरी जाहीर करताना ग्राहकांना पैसे देण्यात असमर्थता दर्शवली होती. तेव्हापासून ग्राहकांचे पैसे एक्सचेंजमध्ये अडकलेत.     

या नवीन खटल्यावर FTX एक्सचेंजकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.     

FTX चा संस्थापक सॅम बँकमन याच्यावर मनी लाँडरिंगच्या आरोपाबरोबरच ग्राहकांनी एक्सचेंजमध्ये गुंतवलेले पैसे इतर उद्योगांसाठी वापरल्याचा आरोप आहे. स्वत: बँकमनने आपण निर्दोष असल्याचं म्हटलंय. आणि अमेरिकन प्रशासनाकडून चौकशी सुरू असतानाच 250 दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या बाँडवर त्याला कस्टडीतून सोडण्यात आलंय.     

FTX एक्सचेंज बुडाल्यानंतर क्रिप्टोकरन्सीतल्या व्यवहारांवर सरकारी नियंत्रणाची गरज पुन्हा एकदा व्यक्त होतेय. आणि एक्सचेंज देशाबाहेरून चालवण्याच्या शिरस्त्यावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कारण, बहुतेक क्रिप्टो एक्सचेंज कर वाचवण्याच्या दृष्टीने बाहेरच्या देशात जिथे नियम फार कठोर नाहीत, तिथे नोंदणी करतात, असं दिसून आलं आहे.