मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रात 'नो कॅश काउंटर' रुग्णालये सुरु करण्यात आले आहेत. दुर्धर आजारावरील उपचार रुग्णांना मोफत मिळावेत यासाठी राज्य सरकारने एक मोहीम सुरु केली आहे. याचाच भाग म्हणून महाराष्ट्रात एकूण 9 'नो कॅश काउंटर' म्हणून धर्मादाय रुग्णालये सुसज्ज करण्यात येणार आहेत. 'नो कॅश काउंटर' हॉस्पिटल म्हणजे अशी रुग्णालये जिथे कॅश काउंटरच नसेल. सगळ्यांना मोफत वैद्यकीय उपचार दिले जातील.
स्व. धर्मवीर आनंद दिघे आणि स्व. गंगुबाई संभाजी शिंदे यांच्या नावे महाराष्ट्रातील पहिले 2 'नो कॅश काउंटर' ठाण्यात सुरु झाली आहेत. महाराष्ट्रातील विविध शहरांत इतर 7 रुग्णालये लवकरच सुरू केली जाणार आहेत.
कुणाला मिळेल लाभ?
या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोफत आरोग्य सुविधा पुरवली जाणार आहे. यासाठी रुग्णाकडे केवळ आधार कार्ड आणि रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी) असणे आवश्यक आहे. केवळ या दोन कागदपत्रांच्या आधारे रुग्णांना वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
स्ट्रेस टेस्ट, इसीजी, एन्जियोप्लास्टी, बायपास सर्जरी, नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट, वोल्व रिप्लेसमेंट तसेच छोट्यामोठ्या 1100 प्रकारच्या सर्जरी या रुग्णालयात मोफत केल्या जाणार आहेत. महाराष्ट्रातील कुठल्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
रुग्ण आणि रुग्णाची शुश्रुता करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये थांबणाऱ्या एका नातेवाइकाची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था देखील मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत मोफत केली जाणार आहे.
टोल फी क्रमांकावर नोंदणी
मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत 8650567567 हा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. या नंबर वर मिस कॉल दिल्यानंतर तुमच्या मोबाईलवर मुख्यमंत्री सहायता निधीचा एक फॉर्म पाठवला जाईल. त्यात रुग्णाची प्राथमिक माहिती, आजाराचा प्रकार, रहिवासी पत्ता इत्यादी माहिती भरायची आहे. सदर फॉर्म भरून तुम्ही तो ऑनलाईनच सबमिट करायचा आहे. त्यांनतर मुख्यमंत्री सहायता निधीकडून तुम्हांला पुढील कारवाईसाठी मार्गदर्शन केले जाईल.
ही सुविधा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असून यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही. तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असाल तर लगेचच टोल फ्री क्रमांकावर कॉल करून माहिती घ्या.