जी-20 बैठकीच्या आधी कॅनडा आणि ब्रिटनसोबत मुक्त व्यापार करार अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात होते. स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली होती. मात्र कॅनडा सरकारने भारताशी या विषयावर बोलणी स्थगित केली आहे. यामुळे दोन्ही देशांमधील मुक्त व्यापार करार होण्याची शक्यता सध्या तरी धूसर दिसते आहे.
Table of contents [Show]
काय आहे कारण?
कॅनडामधील काही राजकीय घडामोडींमुळे कॅनडा-भारत FTA चर्चा रखडली आहे असे सांगण्यात येत आहे. भारताने असा करार करण्यास पहिल्यापासूनच सकारात्मकता दाखवली होती. मात्र कॅनडामधील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यातील राजकीय कुरघोडीमुळे हा विषय सध्या चर्चिला जाऊ शकत नाही असे सूत्रांनी म्हटले आहे.
अर्ली प्रोग्रेस ट्रेड ऍग्रीमेंट (EPTA) स्थगित
गेल्या वर्षी 11 मार्च 2022 रोजी भारत आणि कॅनडा दरम्यान अर्ली प्रोग्रेस ट्रेड ऍग्रीमेंट (EPTA) झाला होता. यानुसार फार्मास्युटिकल्स आणि दुर्मिळ खनिजे तसेच पर्यटन, शहरी पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा आणि खाणकाम या क्षेत्रात दोन्ही देशांनी एकमेकांना सहकार्य करण्याचे मान्य केले होते. तसेच यानिमित्ताने दोन्ही देशातील व्यापाऱ्यांना ज्या किचकट अटींचा सामना करावा लागत होता त्यात सुलभता आणण्यासाठी देखील सहमती दर्शवली गेली होती.
शेती क्षेत्रासाठी महत्वाचा होता हा करार
कॅनडामध्ये हरयाणा, पंजाब व देशातील इतर राज्यांमधील नागरिक मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत. तेथील अनिवासी भारतीयांना भारतीय खाद्यपदार्थ, कडधान्ये पुरविण्यासाठी भारतीय शेतकरी कातम तत्पर असतात. मात्र कॅनडात निर्यात होणाऱ्या स्वीट कॉर्न, बेबी कॉर्न आणि केळी इत्यादी फळांवर कीटकांचा असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता कॅनडा सरकारने काही निर्बंध घातले होते. मात्र EPTA मुळे शेतकऱ्यांना निर्यातीसाठी दोन्ही देशांकडून आवश्यक ते सहकार्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र कॅनडाने हा करार देखील स्थगित केला आहे.
कॅनडाचा नूर का बदलला?
भारताने नुकतेच बासमती आणि बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. तसेच गव्हाच्या निर्यातीवर देखील सरकारने निर्बंध आणले आहेत. याशिवाय गेल्या महिन्यात लॅपटॉप, टॅब्लेट आणि पीसीच्या आयातीवर देखील केंद्र सरकारने निर्बंध आणले आहेत. या सगळ्यांचा परिणाम म्हणून ब्रिटन पाठोपाठ कॅनडा सरकारने देखील भारताशी मुक्त व्यापार कराराविषयी बोलणी थांबवली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.