गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारपेठेत विदेशी गुंतवणूकदारांनी (FPI) सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. मागील महिन्यात म्हणजेच जून 2023 मध्ये 47,148 कोटी रुपयांचे शेअर्स विदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी केले होते. जून महिना संपून आता जुलै महिना सुरू झाला आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेत 22,000 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीवर तज्ज्ञांचे मत काय, जाणून घेऊयात.
गुंतवणूक तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
डिपॉझिटरी डेटानुसार, मार्च 2023 पासून विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात सातत्याने गुंतवणूक केली आहेत. जुलै महिन्यात आत्तापर्यंत 21,944 कोटी रुपयांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी एकूण 34,626 कोटी रुपये शेअर्समधून काढले होते.
कोटक सिक्युरिटीजचे इक्विटी रिसर्चर श्रीकांत चौहान (Shrikant Chauhan) यांनी या गुंतवणुकीबाबत मत मांडताना सांगितले की, इतर देशांच्या तुलनेत भारताचा विकास हा अधिक अनुकूल बाजारपेठ म्हणून उदयाला आला आहे. त्यामुळेच परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारपेठेकडे कल वाढला आहे. जुलै महिन्यातील गुंतवणूक अशीच वाढत राहिली, तर जुलै अखेरीस भारतीय बाजारपेठेतील विदेशी गुंतवणूक सर्वात जास्त वाढेल.
मॉर्निंगस्टार इंडियाचे असोसिएट डायरेक्टर हिमांशू श्रीवास्तव (Himanshu Srivastava, Associate Director, Morningstar India) यांनी या गुंतवणुकीवर भाष्य करताना सांगितले की, सध्या भारत ही जगातील अधिक सक्षम बाजारपेठ म्हणून पुढे येत आहे. आर्थिक मंदीचा परिणाम चीनच्या बाजारपेठेवर होताना पाहायला मिळत आहे.
तसेच जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विजयकुमार (Vijayakumar of Geojit Financial Services) यांनी याबाबत मत मांडताना सांगितले की,'Buy India Sell India' या गुंतवणूक पद्धतीचा वापर गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर करत आहेत. याचा फायदा भारतीय बाजारपेठेतील गुंतवणूक वाढवण्यासाठी होत आहे.
डेट मार्केटमध्ये गुंतवणूक वाढली
विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर्स व्यक्तिरिक्त डेट मार्केटमध्ये गुंतवणूक केली आहे. डेट मार्केटमध्ये जुलैमध्ये 1557 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या वर्षात आत्तापर्यंत भारतीय बाजारपेठेत विदेशी गुंतवणूकदारांनी एकूण 98,350 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर बॉंड मार्केटमध्ये 18,230 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
Source: hindi.financialexpress.com