गेल्या काही महिन्यांपासून भारतीय बाजारपेठेत विदेशी गुंतवणूकदारांचे गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. जून महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेत 47,148 कोटी रुपये शेअर्समध्ये गुंतवले आहेत. विशेष म्हणजे गेल्या 10 महिन्यातील ही सर्वाधिक गुंतवणूक आहे. यापूर्वी ऑगस्ट 2022 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातील शेअर्समध्ये 51,204 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर ही सर्वात मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. भारत ही जगासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे.त्यामुळे विदेशी गुंतवणूकदार भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. या गुंतवणुकीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
जूनमध्ये केलेल्या गुंतवणुकीबद्दल जाणून घ्या
जून महिन्यात एफपीआयने (FPI) फायनान्शिअल, ऑटोमोबाईल, भांडवली वस्तू आणि बांधकाम संबंधित शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच इक्विटी व्यतिरिक्त, एफपीआयने जूनमध्ये डेट मार्केटमध्ये जवळपास 9,200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 2023 मध्ये आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय इक्विटीमध्ये 76,406 कोटी रुपये आणि डेट मार्केटमध्ये 16,722 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
मॉर्निंगस्टार इंडियाचे व्यवस्थापक आणि संचालक हिमांशू श्रीवास्तव (Himanshu Srivastava, Managing Director) म्हणाले की,अमेरिकी फेडरल रिझव्र्हने भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठेत दरवाढीचे चक्र थांबवल्यानंतर गुंतवणुकीला चालना मिळाली आहे. यामुळे भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच चीनच्या आर्थिक सुधारणेबाबत सध्या चिंतेचे वातावरण आहे, अमेरिका आणि ब्रिटनमध्येही सध्या अनिश्चिततेचे वातावरण आहे, या सर्व बाबींमुळे भारतीय बाजारपेठेत विदेशी गुंतवणूकदारांचा ओघ वाढण्यासाठी मदत झाली आहे.
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट व्ही.के. विजयकुमार (V.K. Vijayakumar, Geojit Financial Services Chief Investment Strategist) म्हणाले की, अल्प-मुदतीच्या दृष्टीकोनातून देशातील मुल्यांकन थोडे जास्त असल्याने एफपीआय पुढे जाऊन थोडी सावध भूमिका घेऊ शकते. देशातील एफपीआय गुंतवणूक वाढण्याचे कारण म्हणजे "By India, Sell China" या एफपीआय धोरणातील बदल. यापूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर्स विकले होते. कोविड नंतर चीनची बाजारपेठे नव्याने सुरु झाली होती. त्यामुळे या ठिकाणी विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढले होते. मात्र चीनच्या अस्थिर अर्थव्यवस्थेमुळे पुन्हा एकदा विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारपेठेकडे वळले आहेत.
कोटक सिक्युरिटीजचे इक्विटी रिसर्च (रिटेल) प्रमुख श्रीकांत चौहान (Shrikant Chauhan, Head of Equity Research) म्हणाले की, सध्या जगाची आर्थिक स्थिती फारशी उत्तम नाही. मात्र भारतात देशांतर्गत वाढ होत आहे. याचा फायदा भारतीय बाजारपेठेला आणि विदेशी गुंतवणूकदारांना होत आहे.
क्रेव्हिंग अल्फा या आर्थिक सल्लागार कंपनीचे प्रमुख भागीदार मयंक मेहरा (Mayank Mehra, principal partner at Craving Alpha) यांनी जुलै महिन्यातील एफपीआय गुंतवणुकी बाबत मत मांडले. ते म्हणाले की, जुलै महिन्यात गुंतवणुकीचे प्रमाण कमी होऊ शकते. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने अलीकडेच केलेल्या अनेक टीकांमुळे एफपीआय गुंतवणुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
यापूर्वी कोणत्या महिन्यात किती गुंतवणूक केली आहे?
डिपॉझिटरी डेटातील माहितीनुसार, इक्विटीमध्ये एफपीआयने मे महिन्यात 43,838 कोटी रुपये, एप्रिलमध्ये 11,631 कोटी रुपये आणि मार्चमध्ये 7,936 कोटी रुपये गुंतवले होते. त्यापूर्वी, एफपीआयने जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात शेअर्समधून 34,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली होती.
Source: hindi.moneycontrol.com