Otipy Survey: ऑनलाईन शॉपिंग हे आता नवीन राहिलेले नाही. पण ऑनलाईन काय घ्यायचे आणि ऑफलाईन काय घ्यायचे, याबाबत बरेच ग्राहक जागृत असल्याचे दिसून येते. नुकत्याच ऑटीपाय (Otipy) अॅग्रीटेक कंपनीने केलेल्या सर्व्हेमध्ये प्रतिसाद दिलेल्या लोकांमधून 44 टक्के लोकांनी ऑनलाईन शॉपिंगला पसंती दिली आहे. त्यांच्या मते ई-शॉपिंगमधून चांगल्या प्रतीची फळे आणि भाज्या ते ही घरबसल्या मिळतात, तर भाजी खरेदीसाठी बाजारात जायची गरज काय?
पण त्याचवेळी 56 लोकांचे म्हणणे आहे की, प्रत्यक्ष मार्केटमध्ये जाऊन स्वत: भाजी आणि फळांची निवडून घेणे कधीही चांगले आहे. यातून फळे आणि भाज्या या चांगल्या प्रतीच्या तर मिळतातच. त्याचबरोबर मार्केटमध्ये गेल्यावर आपल्यासमोर खूप सारे पर्याय उपलब्ध असतात. त्यातून आपण बेस्टी फळांची निवड करू शकतो.
ऑटीपाय ही अॅग्रीटेक स्टार्टअप कंपनी
ऑटीपाय ही अॅग्रीटेक स्टार्टअप कंपनी मुंबई आणि दिल्लीमध्ये ताजी फळे, भाज्यांसह किराणा मालाच्या सामानाची विक्री करते. या कंपनीने मे महिन्यात ग्राहकांची शॉपिंगबाबतची बदलती मानसिकता याबाबत एक ऑनलाईन सर्व्हे केला होता. या सर्व्हेत 3000 लोक सहभागी झाले होते. या सर्व्हेतून लोकांचा पैसे खर्च करण्याकडे कसा कल आहे. लोक प्राधान्य कशाला देतात आणि एकूणच पैसे खर्च करताना लोक किती विचार करतात. अशा मानसिकतेला धरून प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत.
वस्तुंची किंमत किंवा कुठे काय परवडते याबाबत या सर्व्हेमध्ये जवळपास 50 लोकांनी असे म्हटले आहे की, ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष मार्केटमध्ये जाऊन फळे किंवा भाजी खरेदी केल्यास ते स्वस्तात मिळतात. तर उर्वरित 50 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मार्केटपेक्षा स्वस्तात वस्तू मिळतात.
इन्स्टंट डिलिव्हरीला प्राधान्य
ऑनलाईन शॉपिंगला 71 टक्के प्राधान्य देणाऱ्यांपैकी 36 टक्के इन्स्टंट डिलिव्हरीला प्राधान्य आहे; तर उर्वरित लोकांना किमान 12 तासात डिलिव्हरी अपेक्षित आहे. ई-शॉपिंगची निवड करताना ग्राहक वेळेची बचत आणि स्वत:ची सोय लक्षात घेत आहेत.
ऑर्गेनिक फळ-भाज्यांना मागणी
सर्व्हेमध्ये प्रतिसाद दिलेल्या 3000 व्यक्तींपैकी 43 टक्के लोक सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या फळांना आणि भाज्यांना पसंती देत असल्याचे दिसून आले. यामागे लोकांचा आरोग्यविषयक दृष्टिकोन दिसून येतो. तर 51 टक्के लोक सर्टिफाईड/प्रमाणित केलेल्या वस्तूच विकत घेतात. त्यांच्यासाठी प्रमाणीकरण खूप महत्त्वाचे आहे. तर 77 टक्के लोक सेंद्रीय उत्पादनांना 10 ते 15 टक्के जास्तीचे पैसे मोजण्यास तयार असल्याचे या सर्व्हेमधून दिसून आले आहे.
अशाप्रकारच्या सर्व्हेमधून हेच दिसून येते की, लोकांच्या आवडी-निवडी या परिस्थितीनुसार बदलत आहेत. ज्यांच्याकडे वेळ आहे; ते मार्केटमध्ये जाऊन स्वत: खरेदी करण्याला प्राधान्य देतात. तर ज्यांच्याकडे पुरेसा वेळ नाही. ते अधिकचे पैसे मोजून सर्टिफाईड कंपन्यांकडून चांगल्या प्रतिची फळे-भाज्या ऑनलाईन मागवण्याला प्राधान्य देतात.