चीनमध्ये कोरोनाचा फैलाव वाढत असून भारतामध्येही कोरोनाची लाट येऊ शकते, अशी भीती वर्तवली जात आहे. कोविड प्रसारामुळे देशाची अर्थव्यवस्था, उद्योग आणि नागरिकांवरही परिणाम होतो. जर भारतामध्ये पुन्हा कोरोनाची लाट आली तर FMCG क्षेत्रावर परिणाम होणार नाही, असे मत या क्षेत्रातील कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. दररोज लागणाऱ्या वस्तू, जसे की, बिस्कीट, पॅकेज्ड फूड, पेय, सोंदर्यप्रसाधने, किराणामालातील वस्तू यांचा FMCG क्षेत्रामध्ये समावेश होतो. यामध्ये अत्यावश्यक आणि अत्यावश्यक नसलेले असे दोन प्रकारच्या वस्तू आहेत.
भारतात कोरोनाची लाट आली तरी वस्तुंच्या पुरवठा साखळीमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. कोरोनाच्या भीतीने दुकानदारांना मालाचा साठा करुन ठेवायचा असला तरी कंपन्या तयार आहेत, त्यामुळे ग्राहकांनीही घाबरुन जाण्याची गरज नाही, असे मत FMCG कंपनीतील एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. मागील दोन वर्षात आलेल्या कोरोना लाटेने सर्वांनाच मोठा धडा शिकवला. मालाचा तुटवडा भासेल या भीतीने अनेकांनी घरामध्ये अतिरिक्त साठा करुन ठेवला होता. त्यामुळे अत्यावश्यक मालाची बाजारात कमतरता भासली होती.
कोरोनाची नवी लाट आली तरी त्यामुळे मोठे आव्हान उभे राहणार नाही. पुढील तीन महिन्यात सण उत्सव आणि विवाह मोठ्या प्रमाण होतील, या शक्यतेमुळे दुकानदार मालाचा साठा करून ठेवत आहे, असे अदानी विल्मर कंपनीचे आंगशु मलिक यांनी म्हटले आहे. अन्नधान्य आणि तेलाचा कोणताही तुटवडा किंवा पुरवठा साखळीमध्ये अडथळा नसल्याचेही ते म्हणाले.
बाजारामध्ये वस्तुंची होत असलेली विक्री आणि पुरवठा याकडे FMCG क्षेत्रातील कंपन्या बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जर अचानक वस्तुंचा खप वाढला तर त्यानुसार पुढील नियोजन आखण्यात येईल. याआधी आलेल्या कोरोना लाटेत कंपन्यांवरही अनेक निर्बंध घालण्यात आले होते. अत्यावश्यक मालाच्या पुरवठ्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, पुरवठा साखळी बिघडल्यामुळे ग्राहकांना वेळेत वस्तू उपलब्ध होत नव्हत्या.