US Credit Rating Downgraded: वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिका दिवाळखोर होण्यापासून वाचला. देशावरील कर्जाचा बोजा इतका वाढला होता की, अमेरिकेच्या संसदेला घाईघाईत कर्जाची मर्यादा वाढवणारा डेट सिलिंग कायदा पास करावा लागला. अन्यथा आर्थिक संकट निश्चित होते. मात्र, अद्यापही संकट संपले नाही, हे दिसून येत आहे. जागतिक पतमानांकन संस्थेने अमेरिकेचे क्रेडिट रेटिंग AAA पासून AA+ असे खाली आणले आहे.
आर्थिक स्थिती खालावल्यास रेटिंगवर परिणाम
एखाद्या देशाची आर्थिक स्थिती चांगली नसल्यास पतमानांकन संस्थांकडून क्रेडिट रेटिंग खाली आणले जाते. (US Credit Rating Downgraded by Fitch) म्हणजेच एखादा देश कर्ज फेडण्यास पूर्णपणे सक्षम नाही, असा त्याचा अर्थ होतो. देशावरील एकूण कर्जाचा बोजा, कर्ज फेडण्याची क्षमता, अर्थव्यवस्थेची स्थिती, असे अनेक घटक रेटिंग कमी करण्यास कारणीभूत ठरतात. काल (बुधवार) Fitch या कंपनीने अमेरिकेचे क्रेडिट रेटिंग कमी केले. या घटनेचा परिणाम जगभरातील भांडवली बाजारांवर झाला.
1 हजार अंकांनी सेन्सेक्स कोसळला
अमेरिकेचे पतमानांकन कमी केल्याचा परिणाम जगभरातील भांडवली बाजारावर झाला. काल सेन्सेक्स तब्बल 1 हजार अंकांनी कोसळला. S&P या रेटिंग संस्थेने यापूर्वी 2011 साली अमेरिकेचे क्रेडिट रेटिंग कमी केले होते. तेव्हाही बाजारात उलथापालथ झाली होती. अमेरिका जगातील बलाढ्य अर्थव्यवस्था असल्याने तेथील घडामोडींचा स्थानिक बाजारावर परिणाम होतो.
आज भारतीय शेअर बाजाराची स्थिती कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल गुंतवणुकदारांचा शेअर्स विक्रीवर भर होता. सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात ट्रेड करत होते. स्थानिक बाजारात नफा काढून घेण्यावर भर दिसून आला. मात्र, बाजारातील ही स्थिती तात्पुरती असल्याचे काही बाजार विश्लेषकांचे मत आहे.