महाराष्ट्राचे कुलदैवत कुलस्वामिनी तुळजा भवानी मंदिराला दरवर्षी लाखो भक्तगण हजेरी लावत असतात. दर्शनाला आलेले भाविक आपापल्या कुवतीनुसार देवस्थानाला देणगी देत असतात. या देणग्यांमध्ये रोख रक्कम, सोने, चांदी, विविध प्रकारचे मौल्यवान अलंकार, सोन्या-चांदीचे नाणे, हिरे,मोती देखील भेट म्हणून चढवले जातात. गेल्या 13 वर्षांपासून देवस्थानाला प्राप्त झालेल्या देणग्यांची मोजणी झाली नव्हती. 2009 साली शेवटची मोजणी झाली होती, त्यानंतर तब्बल 13 वर्षांनी आता देणगी म्हणून आलेल्या वस्तूंची मोजणी आणि मूल्य ठरवले जाणार आहे.
कायद्यानुसार तुळजापूरचे जिल्हाधिकारी हेच संस्थानचे अध्यक्ष म्हणून काम बघतात. विद्यमान जिल्हाधिकारी तथा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांच्या आदेशानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणि समितीच्या पाहणीखाली देणग्यांची मोजणी सुरु झाली आहे. मोजणीवेळी व्हिडियो शुटींग देखील केले जात आहे.
स्पेशल सोनाराची नियुक्ती
देणगी म्हणून देवस्थानाला प्राप्त झालेल्या सोन्या-चांदीची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांनी खास सोनाराची नियुक्ती केली आहे. देणगी म्हणून प्राप्त झालेले सोने खरे आणि किंवा बनावट याची पाहणी करण्याचे काम त्यांना देण्यात आले आहे. 2009 पासून देवस्थानाकडे जमा झालेल्या सोन्या-चांदीची, हिऱ्या-मोत्याची मोजणी 7 जूनपासूनच सुरु झाली आहे. 12 जूनपर्यंत 354 हिरे आणि 207 किलो चांदीची मोजणी करण्यात आली आहे. आजचा सोन्याचा भाव लक्षात घेता एकूण सोन्याची किंमत तब्बल 70 कोटी इतकी आहे. तर प्राप्त झालेल्या हिऱ्यांची किंमत अंदाजे 20 लाख रुपये इतकी आहे. चांदीची गणती लक्षात घेता, उपलब्ध आकडेवारीनुसार देवस्थानाकडे 2586 किलो चांदी जमा झाली आहे. याची किंमत जवळपास 19 कोटींच्या आसपास आहे.
2005 मध्ये झाला होता संपत्तीचा पंचनामा
2001 ते 2005 या दरम्यान देवस्थानातील 71 ऐतिहासिक नाणी गहाळ झाल्याचे प्रकरण समोर आले होते. वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी देवी चरणी अर्पण केलेली सोन्या-चांदीची दुर्मिळ नाणी देवस्थान प्रशासनाकडून गहाळ झाली होती. त्यांनतर याचा तपाs करणाऱ्या समितीने या प्रकरणाचा अहवाल सादर केला होता, त्यात मंदिरातील सेवेकऱ्यांनी आणि प्रशासनाने देवीच्या अंगावरील माणिक, 2 चांदीचे खडाव आणि 71 ऐतिहासिक नाणी गहाळ केल्याचा आरोप केला गेला होता. हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट असून आता जिल्हाधिकारीच संस्थानाचे मुख्य प्रशासक म्हणून काम बघतात.