भारतातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची इंडस्ट्री आहे. भारताची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येणाऱ्या काळात देखील वाहन खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे हे काही वेगळे सांगायला नको. वाढत्या गाड्यांच्या संख्येमुळे वाहतुकीचे प्रश्न देखील निर्माण झाले आहेत. वाहतुकीचे नियम देखील नागरिकांना वेळोवेळी समजावून सांगावे लागत आहेत.
रहदारीच्या रस्त्यावर वाहने पार्क करून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना अडथळा निर्माण करणारे लोक तुम्ही पाहिलेच असतील. 8 फुट, 6 फुट रस्त्यावर देखील डंपर, चारचाकी गाड्या, मालगाड्या उभ्या केलेल्या तुम्ही पहिल्या असतील. यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना, दुचाकी आणि सायकल वापरणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. अनेकदा अशा घटनांमुळे दोन-तीन तासांचा चक्का जाम देखील होतो. मुंबई आणि पुण्यातील लोकांना तर हे आता नेहमीचेच झाले आहे. आता वाहतुकीची, पार्किंगची ही समस्या आणि नागरिकांचा बेशिस्तपणा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांच्या नजरेतून सुटलेला नाही.
#MCPolicyNext | "Whoever clicks a picture of people violating parking rules, will get cuts from the fine we collect from the violator as an incentive," said @nitin_gadkari, @MORTHIndia
— Moneycontrol (@moneycontrolcom) March 23, 2023
Watch the full event LIVE?
? https://t.co/Q58f6POAzK @shwwetapunj @OfficeOfNG pic.twitter.com/amKCR7i2PD
बेशिस्तीने वाहन पार्क करणाऱ्या आणि इतर नागरिकांच्या रहदारीत अडथळा आणणाऱ्या वाहन चालकांवर आता कारवाई करण्याच्या विचारात नितीन गडकरी आहेत. एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, जर कोणी रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क केले तर त्याचे छायाचित्र पाठवणाऱ्याला 500 रुपयांचे बक्षीस दिले जाईल आणि वाहन चालकाला 1000 रुपयांचा दंड ठोठावला जाईल.
लवकरच नियम आणण्याच्या तयारीत
वाहतूक विभागाला याबाबत आपण सूचना करणार असून लवकरच अशा स्वरूपाचा निर्णय परिवहन मंत्रालयाकडून घेण्यात येईल असे नितीन गडकरींनी म्हटले आहे. यामुळे चुकीच्या पद्धतीने वाहन पार्किंगला आळा बसेल आणि रहदारी देखील सुरळीत सुरु राहील. यासाठी परिवहन मंत्रालय सामान्य नागरिकांसाठी खास पोर्टल तयार करू शकते असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. तसेच सोशल मिडीयावर देखील अशा स्वरूपाच्या तक्रारी सामान्य नागरिक परिवहन मंत्रालयाच्या नजरेत आणून देत असतात.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुचवल्याप्रमाणे कायदा अस्तित्वात आल्यास शहरातील ट्रॅफिक जॅमपासून नागरिकांना बऱ्याच अंशी दिलासा मिळणार आहे. तसेच ‘Pay and Park’ चा देखील लोक वापर करू लागतील असे गडकरींनी म्हटले आहे.
ही आहेत कारणे
रहदारीच्या ठिकाणी माल वाहतूक करणाऱ्या गाड्या पार्क केल्या जातात. तसेच शाळा, कॉलेज व इतर शैक्षणिक संस्थाच्या बसेस देखील शाळेच्या, कॉलेजच्या बाहेर पार्क केल्या जातात. शैक्षणिक संस्थांचे स्वतःच्या मालकीचे मैदान असतानाही ते मुख्य रस्त्यावर गाड्या पार्क करतात. त्यामुळे इतर छोट्या वाहनांना आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळे फक्त वेळच वाया जात नाही तर थेट नागरिकांच्या खिशावर देखील त्याचा परिणाम पहायला मिळतो.
तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडलेल्या वाहनांचा इंधन वापर अधिक होतो, त्यामुळे साहजिकच पेट्रोलचा खर्च वाढतो. दुचाकी वाहनांच्या बाबतीत बोलायचे झाले तर वारंवार ब्रेक दाबल्यामुळे ब्रेकची झीज आणि क्लच प्लेटची देखील झीज देखील पाहायला मिळते. रिक्षाने जर तुम्ही प्रवास करत असाल आणि ट्रॅफिक जॅममध्ये अडकलात तर रिक्षाचे मीटर तुमच्याकडून अव्वाच्या सव्वा रुपये आकारते, हे तुम्ही कधी ना कधी अनुभवलेच असेल.