बँकेमध्ये बचत खात्यामध्ये पैसे पडून असल्यावर कसे खर्च होतात लक्षात येत नाही. सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे न ठेवता गुंतवणूक केलेले कधीही चांगले. जर खात्यात पैसेच नसतील तर आपोआप खर्च कमी होईल. मात्र, जर आणीबाणीच्या वेळी अचानक पैशांची गरज लागली तर काय करणार हा प्रश्नही उभा राहू शकतो. कारण, बचत खात्यातून गरज असेल तेव्हा तत्काळ पैसे काढता येतात. तसेच सेव्हिंग अकाउंटवर खूप कमी व्याज मिळते. आणीबाणीच्या काळात लगेच पैसेही मिळतील आणि चांगला व्याजदरही मिळेल यासाठी लिक्विड फंड हा एक चांगला पर्याय आहे.
लोकांना पैसे बचत करण अवघड का जातं?
सेव्हिंग अकाउंटमध्ये मध्ये पैसे पडून असल्यावर खर्च करण्याचा मोह आवरत नाही.
गुंतवणूक केलेले पैसे लगेच काढता येत नाहीत. त्यामुळे आणीबाणीत गरज पडेल म्हणून काही जण बचत खात्यात पैसे ठेवणं पसंत करतात.
कमी पैशात गुंतवणूक होत नाही तसेच गुंतवणूक करण्यासाठी जास्त पैशांची आवश्यकता असते, असा समज काही नागरिकांचा असतो.
गुंतवणूक आणि बचतीचे पुरेसे ज्ञान आणि माहिती नसणे.
शिस्तीचा अभाव आणि चालढकल करण्याची सवय
लिक्विड फंड बचत करण्यासाठी कसे फायदेशीर ठरतील?
लिक्विड फंडातील गुंतवणुकीद्वारे पैसे तुमच्या बचत खात्यात राहणार नाहीत. त्यामुळे खर्च आपोआप कमी होईल.
लिक्विड फंडात गुंतवलेले पैसे तुम्ही 24x7 कधीही काढू शकता. एकूण गुंतवणुकीपैकी 90% रक्कम किंवा 50 हजार रुपये 30 मिनिटात तुमच्या खात्यात जमा होतील.
लिक्विड फंडात तुम्ही 500 रुपयेसुद्धा गुंतवू शकता. यातून बचतीची सवय लागते.
लिक्विड फंडांवर सात टक्क्यांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त व्याजदर मिळू शकतो. तसेच जोखीमही कमी असते.
नवख्या गुंतवणुकदारांसाठी लिक्विड फंड चांगला पर्याय आहे. तसेच लिक्विड फंडाची एसआयपी तुम्ही सुरू करू शकता. दर महिन्याला तुमच्या खात्यातील पैसे लिक्विड फंडात जातील. त्यामुळे बचतीची सवयही लागेल.
जर तुम्ही लिक्विड फंडात गुंतवणूक केल्यानंतर तत्काळ पैसे काढत असाल तर अल्प प्रमाणात दंड लागू होतो.