30 सप्टेंबर 2023 ही तारीख सर्वच व्यक्तींसाठी अत्यंत महत्वाची तारीख आहे. देशात पैशांशी संबधित काही नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. ज्यात दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याचा शेवटचा दिवस असो किंवा म्युच्युअल फंड किंवा अगदी तुमचं बचत खातं असो, 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला तुमच्या या खात्यांचं नॉमिनेशन जाहीर करावं लागणार आहे. असं न केल्यास ती खाती 1 ऑक्टोबरपासून गोठवली जाणार आहेत. एक नजर टाकूया 30 सप्टेंबरपर्यंत पैशाशी संबंधित कोणत्या गोष्टींची खबरदारी तुम्हाला घ्यावी लागणार आहे त्यावर.
1 ऑक्टोबरला बदलणार 'हे' नियम
Table of contents [Show]
डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यासाठी नॉमिनेशन अनिवार्य
सेबीने डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यासाठी नॉमिनेशन अनिवार्य केलं आहे. याची डेडलाईन 30 सप्टेंबर 2023 रोजी संपत आहे. त्यापूर्वी नॉमिनेशन न केलं गेल्यास 1 ऑक्टोबरपासून अशी खाती फ्रीज केली जातील. त्यामुळे नॉमिनेशन केलं नसल्यास 1 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला सेबीने वेळ दिला आहे.
म्युच्युअल फंडासाठी नॉमिनेशन बंधनकारक
डिमॅट आणि ट्रेडिंग खात्याव्यतिरिक्त जर तुम्ही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत असाल तर त्या खात्याचंही तुम्हाला नॉमिनेशन करणं बंधनकारक असणार आहे. यासाठीही सेबीने 30 सप्टेंबर 2023 ही डेडलाईन निश्चित केलेली आहे. त्यामुळ वेळेत तुम्ही या खात्याचं नॉमिनेशन जाहीर केलं नाही तर तुमचं हे खातंही सेबी गोठवू शकते.
TCS च्या कायद्यातही होणार बदल
विदेशी जाण्याचा विचार पक्का केला असेल तर हे अवश्य वाचा. कारण 1 ऑक्टोबरपासून परदेशी जाण्यासाठी एखादं टूर पॅकेज तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यासाठीही काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. 7 लाख रुपयांपेक्षा कमी टूर पॅकेज घेण्यासाठी तुम्हाला 5 टक्के TCS द्यावा लागणार आहे. तर 7 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचं टूर पॅकेज तुम्ही निवडणार असाल तर त्यासाठी तुम्हाला 20 टक्के TCS द्यावा लागणार आहे.
दोन हजाराच्या नोटा बदलण्याची डेडलाईन
दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची म्हणजेच बँकेत भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 ही आहे. त्यानंतरही तुम्ही दोन हजार रुपयांच्या नोटा बदलल्या नसल्यास त्या नोटांना महत्व उरणार नाही.
बर्थ सर्टिफिकेट असणार अनिवार्य
बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच जन्माचा दाखला तुमच्याकडे असणं बंधनकारक असणार आहे. 1 ऑक्टोबरपासून अगदी शाळेत दाखला घेणं असो, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करायचा असो, मतदार यादीत नाव नोंदवणं असो, आधार कार्डाचं रजिस्ट्रेशन करणं असो, लग्नाचा दाखला मिळवणं असो किंवा सरकारी नोकरीसाठी अर्ज करणं असो जन्माचा दाखला या साऱ्यासाठी बंधनकारक असणार आहे.
बचत खात्यासाठी आधार असणं ठरणार महत्वाचं
हासुद्धा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 ऑक्टोबरच्या आधी छोट्या बचत योजना असो, पीपीएफ असो किंवा पोस्ट ऑफिसात केलेली गुंतवणूक असो इथं तुम्हाला तुमचं आधार कार्ड लिंक करणं महत्वाचं असणार आहे. 1 ऑक्टोबरपर्यंत याची मुदत देण्यात आली असून ही खाती आधारशी लिंक केली नसल्यास ही खाती गोठवली जाणार आहेत.