‘2023 सालापर्यंत भारतात तरुण आणि कष्टकरी लोकांचं प्रमाण जगात सर्वाधिक असणार आहे. शिवाय देशात आर्थिक नियोजनासाठी स्वतंत्र कार्यक्षम यंत्रणा आहे (नीती आयोग) आणि केंद्रात स्थिर सरकार आहे. या सकारात्मक घटकांमुळे देशाची अर्थव्यवस्था येणाऱ्या काळामध्ये वेगाने पुढे जाईल आणि 2040 पर्यंत देशात परकीय संस्थांकडून 200 अमेरिकन डॉलर पर्यंतची गुंतवणूक होऊ शकेल,’ असा विश्वास क्वांटम अॅडव्हायजर्स या जागतिक संशोधन संस्थेचे संस्थापक अजित दयाल यांनी व्यक्त केला आहे.
हा विश्वास व्यक्त करताना आताची परिस्थिती भारताला धार्जिणी नाही असंही त्यांनी मान्य केलं आहे. परदेशातून होणारी गुंतवणूक ही दोन मार्गांनी होते. एक म्हणजे भारतीय कंपन्यांवर विश्वास असेल तर परदेशातले संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करतात.
आणि दुसरा मार्ग आहे थेट परदेशी गुंतवणुकीचा, जिथे परदेशातल्या कंपन्या भारतातल्या औद्योगिक वातावरणावर विश्वास ठेवून इथल्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करतात. दयाल यांची कंपनी शेअर बाजारातले आणि मोठ्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओचा आढावा घेत असते. आणि त्यावर आधारित आपला अहवाल आणि निष्कर्ष सादर करते.
सध्या मॉर्गन स्टॅनले कॅपिटल इंटरनॅशनल (MSCI) या जगातल्या आघाडीच्या गुंतवणूक संशोधन करणाऱ्या कंपनीने भारताला कमी रँकिंग दिलं आहे. म्हणजे परदेशी गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. असं असताना दयाल मात्र भारताच्या भविष्याबद्दल आशादायी आहेत.
असं का ते सांगताना ते म्हणतात, ‘गुंतवणूक भविष्याकडे पाहून केली जाते. आता भारताचा जीडीपी जगात पाचवा आहे. म्हणजे हा देश आताच जगातली पाचवी महत्त्वाची अर्थव्यवस्था आहे. आणि भविष्यात भारत युके, जर्मनी या देशांनाही मागे टाकणार आहे. त्यातच देशात तरुणांची संख्या वाढते आहे. देशातलं स्थिर सरकार आणि गुंतवणुकीसाठी लागणारं सुरक्षित फ्रेमवर्क यामुळे भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेतली वाढ स्पष्ट दिसतेय. अशावेळी उज्ज्वल भविष्य असलेल्या देशात गुंतवणूक वाढली तर आश्चर्य वाटायला नको.’
भारतातलं बँकिंग क्षेत्रंही स्थिर आहे, असं दयाल यांना वाटतं. त्यामुळे आता कुणालाही अपेक्षा नसली तरी येणाऱ्या दिवसांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था सुसाट पळू शकेल असा त्यांचा अंदाज आहे.
देशांतर्गत उत्पादन, निर्यात आणि संस्थात्मक यंत्रणा हे आर्थिक विकासाला पाठबळ देतात. आणि यात प्रगती करण्याच्या संधी भारतासमोर आहेत, असं दयाल यांना वाटतं.