Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FCRA Violation: तिरुपती मंदिर ट्रस्टला 3 कोटींचा दंड!

Tirupati Balaji Temple

Image Source : www.en.wikipedia.org

Tirupati Balaji FCRA News: तिरुपती मंदिर प्राधिकरणावर विदेशी योगदान (नियमन) कायदा म्हणजेच FCRA चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.या कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी संस्थानाला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. सरकारने केलेल्या कारवाईमुळे मंदिर प्रशासन मात्र कमालीचे सतर्क झाले आहे.

Tirumala Tirupati Devasthanams: जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिरांपैकी एक असलेल्या तिरुपती मंदिर संस्थानाला परदेशी देणगी घेण्यासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्राने 3 कोटींचा दंड ठोठवला आहे.

सुरुवातीला तिरुपती मंदिर ट्रस्टला  केंद्राने 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.मंदिरातील 'हुंडी'मध्ये परकीय चलन आढळले होते, ज्याचा हिशोब ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे.देणगी किंवा दान स्वरूपात मिळणाऱ्या परदेशी चलनातील संपत्तींचा हिशोब सरकारला देणे कायद्याने बंधनकारक आहे.

FCRA नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुपती मंदिर प्राधिकरणावर विदेशी योगदान (नियमन) कायदा म्हणजेच FCRA चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.या कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी संस्थानाला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. सरकारने केलेल्या कारवाईमुळे मंदिर प्रशासन मात्र कमालीचे सतर्क झाले आहे. 

मंदिराचे विश्वस्त मंडळ FCRA नियामक मंडळासोबत वेळोवेळी बैठका घेत असते आणि त्यांना देणग्यांचा हिशोब देत असते. या कारवाईनंतर मंदिर प्रशासन आणि  FCRA नियामक मंडळादरम्यान काही वाटाघाटी झाल्या आणि अखेर 10 कोटी रुपयांच्या दंडाची रक्कम 3 कोटींवर आणण्यात आली.

मंदिर प्रशासनाचे स्पष्टीकरण

सदर कारवाईनंतर तिरुपती मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनी माध्यमांशी संवाद साधला. FCRA नियामक मंडळाने ठोठावलेला दंड संस्थानने भरला असल्याची माहिती त्यांनी दिली.संस्थान केवळ हुंडीद्वारेच परदेशी चलनातील नोटा स्वीकारते असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय कुठल्याही प्रकारे संस्थान परदेशी देणग्या स्वीकारत नाही असे रेड्डी यांनी म्हटले आहे.

सुब्बा रेड्डी यांनी असाही दावा केला आहे की, केंद्राला विदेशी देणग्या स्वीकारण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. परंतु,कायद्यानुसार परदेशी देणगीचा पैसा वापरताना FCRA नियामक मंडळाला कांही त्रुटी आढळल्या आहेत.तसे नियमांक मंडळाने संस्थानाला कळवले देखील आहे.

काय आहेत आरोप?

एफसीआरएच्या नियमांनुसार परकीय चलनातून मिळालेल्या पैशावर कोणतेही व्याज आकारले जाऊ शकत नाही. परंतु तिरुपती मंदिर प्राधिकरणाने बँकेत ठेवलेल्या परकीय चलनावर व्याज घेतल्याचा आरोप आहे.

मंदिर प्रशासनाने यावर उत्तर देताना म्हटले आहे की, संस्थानाला मिळालेले विदेशी चलनाचे भारतीय चलनात रुपांतर केले जाते, त्यानंतर ते पैसे मंदिर संस्थानाच्या बँक खात्यात ठेवले जातात. संस्थान करत असलेल्या या प्रक्रियेत केंद्र सरकारला काही विसंगती आढळून आल्या आहेत. या विसंगती दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत असून आम्ही ही प्रक्रिया पूर्णतः थांबवली असल्याचे संस्थानने म्हटले आहे.

तिरुपती मंदिर ट्रस्टकडे  FCRA नोंदणी नव्हती!

तिरुपती मंदिर प्राधिकरणाला 2008 आणि 2012 मध्ये FCRA नोंदणी मिळाली होती.ठराविक कालावधीनंतर या नोंदणीचे नुतनीकरण करणे गरजेचे असते. मात्र 2012 नंतर संस्थानने FCRA नोंदणीचे नूतनीकरण करण्यास विलंब केला. परिणामी संस्थानाची FCRA नोंदणी रद्द झाली आहे.

तिरुपती मंदिर अधिकारी गेल्या तीन वर्षांपासून FCRA नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी सरकारकडे विनंती करत आहे. या प्रश्नावर राज्य सरकारच्या सहकार्यासाठी मंदिर प्रशासनाने केंद्राकडे वारंवार आवाहन केले आहे. मात्र, गृह आणि अर्थ मंत्रालयाने त्याला प्रतिसाद दिला नाही, असे संस्थानचे म्हणणे आहे.

एफसीआरए नोंदणी नसल्यामुळे मंदिर अधिकारी 'हुंडी'द्वारे विदेशी देणग्या स्वीकारत होते. मात्र रक्कम वाढत असल्याने स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला आक्षेप घेतला. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने चौकशी सुरू केली.मार्च 2023 पर्यंत संस्थाकडे 30 कोटी परकीय चलनांमध्ये देणगी प्राप्त झाली आहे.

परंतु आता पुढील पाच वर्षांसाठी तिरुपती मंदिर प्राधिकरणाला  FCRA नोंदणी प्राप्त झाली असल्याची बातमी आली आहे. यापुढे देवस्थानाला परकीय चलन देणगी म्हणून घेता येणार आहे.

SBI ने विदेशी चलन स्वीकारण्यास केली मनाई 

केंद्र सरकारच्या FCRA नियमांनुसार परदेशी देणग्या संस्थांना SBI बँकेत जमा कराव्या लागतात. कायद्यानुसार ओळख असलेल्या व्यक्तींच्या देणग्या बँक स्वीकारते. हुंडीमध्ये दिलेल्या देणग्या कुणी दिल्या याची माहिती संस्थानाकडे नसल्यामुळे ही रक्कम SBI ने स्वीकारण्यास मनाई केली होती. 

FCRA च्या नियमांमध्ये हुंडीमध्ये दिलेल्या देणगीचा उल्लेख नसल्यामुळे संस्थानापुढे पेच निर्माण झाला होता. यानंतर अशा देणग्या घेतल्याच जाऊ नयेत असे केंद्र सरकारने म्हटले होते. त्यामुळे संस्थानावर ही कारवाई करण्यात आली आहे.

भारताच्या तिरुपती बालाजी मंदिरात राष्ट्रीयीकृत बँकांमधील 10.3 टन सोन्याच्या ठेवी आणि ₹15,938 कोटी ($1.94 अब्ज) रोख ठेवी आहेत.. मंदिराच्या एकूण मालमत्तेची किंमत ₹2.26 लाख कोटी ($27.56 अब्ज) इतकी आहे.जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर म्हणून तिरुपती बालाजी हे संस्थान ओळखले जाते.