Social Media Influencers: सध्या डिजिटल जाहिरातींचा जमाना आहे. कंपन्यांचे ग्राहक फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूबर असतील तर कंपन्यातरी कुठे जाणार? प्रिंट, होर्डिंग, टीव्ही जाहिरातींना उतरती कळा लागली असताना डिजिटल माध्यमे मात्र, सुसाट वेगाने निघाली आहेत. त्यामुळे इन्फ्लूएनसर हा परावलीचा शब्द बनला आहे. कंपन्यांनाही आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी या इन्फ्लूएन्सर्सची गरज पडते. मात्र, या डिजिटल इकॉनॉमीचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.
देशात 8 कोटी इन्फ्लूएन्सर्स
भारतामध्ये सुमारे 8 कोटी सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स आहेत. यातील काहींना कोट्यवधींमध्ये तर काहींना लाख आणि हजारात फॉलोअर्स आहेत. मात्र, हे सर्व युजर खरे आहेत का? तर याचं उत्तर नाही असं आहे. 100 रुपयांत 1000 फॉलोवर्स मिळवून देतो, अशा जाहिराती तुम्ही नक्कीच पाहिल्या असतील. यातील अनेक फॉलोवर्स हे खोटे असतात.
फेक फॉलोअर्सचा गोरखधंदा
बनावट आणि कृत्रिम पद्धतीने फॉलोअर्स वाढवतात येतात. फक्त आकडा फुगलेला दिसतो. प्रत्यक्षात तेवढे युजर्स अस्तित्वातच नसतात. भारतीय इन्फ्लूएन्सर्सचे 60 टक्के फॉलोअर्स बनावट, कृत्रिम आणि निष्क्रिय (इनअॅक्टिव्ह) असल्याचे Klug India मार्केट रिसर्च कंपनीने म्हटले आहे. क्लूग इंडिया ही कंपनी रिलायन्स जिओ, फर्स्ट क्राय, डब्लूपीपी अशा बड्या कंपन्यांसोबत मिळून काम करते.
या बनावट इन्फ्लूएन्सर्समुळे कंपन्यांचीही डोकेदुखी वाढली आहे. ज्या इन्फ्लूएन्सरला जास्त फॉलोअर्स आहेत त्याला कंपनी जाहिरात करण्यासाठी निवडते. मात्र, हे बनावट फॉलोअर्स वाढल्याने कंपन्यांना खरे इन्फ्लूएन्सर कोण हे समजत नाही. अनेक कंपन्यांच्या मार्केटिंग विभागातील प्रमुखांनी ही चिंता बोलून दाखवली आहे. फॉलोअर्स पाहूनच कंपनी पैसे देते. त्यामुळे कंपन्यांचे पैसेही वाया जात आहेत.
कंपन्यांपुढील चिंता वाढली
मारुती सुझुकीच्या मार्केटिंग विभागातील वरिष्ठ अधिकारी शशांक श्रीवास्तव सांगतात की, इन्फ्लूएन्सर्स मार्केटिंग वाढत आहे. मात्र, फेक फॉलोअर्स हा आमच्यापुढील मोठी समस्या आहे. कंपन्यांचे पैसे तर जातातच. मात्र, ब्रँडची इमेजही यामुळे खराब होत आहे.
पारले इंडियाचे मार्केटिंग विभागातील अधिकारी मयांक शहा म्हणतात की, एखाद्याचे फॉलोअर्स पाहून आम्ही पैसे ठरवतो. एखाद्या इन्फ्लूएन्सर्सची निवड करताना त्याला किती जण फॉलो करतात यावर असते. मात्र, फेक फॉलोअर्सने आमची चिंता वाढलीय.