महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडनं (MMMOCL) मेट्रो लाइन 7 आणि 2A या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा दिलाय. या मार्गावरचे संभाव्य धोके, जोखीम लक्षात घेऊन मेट्रोनं विमा (Insurance) उपलब्ध करून दिलाय. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अपघात, अपंगत्व त्याचप्रमाणे प्रवासादरम्यान काही अपघात किंवा दुखापतीमुळे होणारा वैद्यकीय खर्च झाल्यास त्याचा समावेश मुंबई मेट्रोच्या या विमा पॉलिसीत करण्यात आलाय. याशिवाय कोणत्याही अनपेक्षित दुर्दैवी परिस्थितीमुळे होणाऱ्या मृत्यूपासून संरक्षण देण्याचा मुंबई मेट्रोचा प्रयत्न यानिमित्तानं असणार आहे.
Table of contents [Show]
उपचारांसाठी कव्हरेज
या पॉलिसीनुसार रूग्णालयात भरती झाल्यास जास्तीत जास्त 1 लाख रुपये तर बाह्यरुग्ण उपचारांसाठी 10,000 रुपयांपर्यंतचं कव्हरेज देण्यात येणार आहे. दुर्दैवानं मृत्यू झाल्यास 5 लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई देण्याचं यामध्ये समाविष्ट आहे. ज्याठिकाणी बाह्यरुग्ण उपचार आणि हॉस्पिटलायझेशन असणार आहे, त्याठिकाणी ओपीडी खर्च जास्तीत जास्त 10,000 हॉस्पिटलायझेशन कव्हर व्यतिरिक्त दिले जाणार आहेत. म्हणजेच, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास किरकोळ दुखापतींसाठी भरपाईसह वैद्यकीय खर्चांतर्गत देय असलेली कमाल रक्कम 90,000 रुपये असणार आहे.
Mumbai Metro to provide insurance cover to Metro 2A, 7 commuters https://t.co/N8FNxwN2IF@MMRDAOfficial @MMMOCL_Official @metrorailtoday_
— Vinod Shah (@TheVinodShah) May 29, 2023
सुरक्षिततेची हमी
या अपघात विम्याविषयी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे सीएमडी एसव्हीआर श्रीनिवास म्हणाले, की मार्गावरचे संभाव्य धोके लक्षात घेता प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्व स्तरावर सुरक्षिततेची हमी देणारे पर्याय आम्ही उपलब्ध करून देत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून हा अपघात विमा असणार आहे. प्रवासी आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. या अपघात विम्यामुळे मेट्रोनं प्रवास करणारा कोणताही प्रवासी निश्चिंत, शांतपणे प्रवास करू शकणार आहे.
पॉलिसीची रक्कम परिस्थितीवर अवलंबून
परिस्थिती कशाप्रकारची आहे, त्यावर पॉलिसीची रक्कम अवलंबून असणार आहे. मृत्यू झाल्यास 5,00,000 रुपयांपर्यंतचं कव्हरेज असणार आहे. कायमस्वरूपी आणि आंशिक अपंगत्व आल्यास त्यासाठी 4,00,000 रुपयांपर्यंत भरपाई मुंबई मेट्रो देणार आहे. वैध तिकीट, पास, स्मार्ट कार्ड, क्यूआर कोड, वैध परवानगी असलेल्या अशा सर्व प्रवाशांना याचा लाभ मिळू शकतो. यासाठी प्रवासी हा मुंबई मेट्रोच्या इमारतीत, स्थानकात, ट्रेनमध्ये, स्टेशन परिसरात कुठेही, मेट्रो स्टेशनच्या इमारतीबाहेर, पार्किंग अशाठिकाणी असायला हवा. त्यानंतरच याचे लाभ मिळू शकतात.
मुंबई मेट्रो प्रकल्प
मुंबई मेट्रो हा सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबईसारख्या अधिक लोकसंख्येच्या शहरात पायाभूत सुविधांतर्गत मेट्रो सुविधा पुरवली जाते. मुंबईत लोकल असल्या तरी त्यावर प्रचंड भार आहे. त्यामुळे 2006मध्ये मुंबई मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. मेट्रो 2A, मेट्रो 7, मेट्रो 1, मेट्रो 2B, मेट्रो 3, मेट्रो 4, मेट्रो 4A, मेट्रो 5, मेट्रो 6 असे विविध मार्ग असून यातली मेट्रो 1, 2A आणि 7 सध्या सुरू आहेत. तर इतर प्रस्तावित, बांधकामाधीन मार्ग आहेत. या मार्गिकांचे कामही लवकर पूर्ण होऊन मुंबईकरांच्या सेवेत ती उपलब्ध होणार आहे. दरम्यान, अपघात विम्यामुळे मुंबईकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुरक्षित झालाय.