Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EV Scooter: इलेक्ट्रिक दुचाकी किती रुपयांनी महागल्या; नवी गाडी घेताना किती पैसे जास्त मोजावे लागतील?

EV Sale

Image Source : www.evtechnews.in

इलेक्ट्रिक दुचाकीच्या किंमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे दिसून येत आहे. जून महिन्यापासून गाड्यांच्या किंमती 18 टक्क्यांनी वाढल्याने ग्राहकांनीही खरेदीकडे पाठ फिरवली आहे. टॉप मॉडेल्सच्या किंमती दीड लाखांच्या घरात पोहचल्या आहेत. पेट्रोल आणि इलेक्ट्रिक दुचाकी गाड्यांच्या किंमतीतील तफावत आणखी वाढली आहे.

EV Scooter Price Hike: तुम्ही जर इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जास्त पैसे मोजायला तयार राहा. कारण जून महिन्यापासून इलेक्ट्रिक दुचाकींच्या किंमती 15 ते 18 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे नव्या गाड्यांची मागणी मागील 16 महिन्यांच्या तळाला पोहचली आहे. 1 लाख रुपयांना मिळणारी इव्ही स्कूटी आता 1 लाख 20 हजार रुपयापर्यंत गेल्याने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे.

किंमती सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकारकडून इव्ही वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना अनुदान देण्यात येते. मात्र, सरकारने हे अनुदान निम्म्याने कमी केले आहे. त्यामुळे आघाडीच्या दुचाकी निर्मिती कंपनीने जूनपासून विविध श्रेणीतील गाड्यांच्या किंमती 18 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहे. (EV Scooter Price Hike) त्यामुळे किंमती आता सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर चालल्या आहेत. टॉप मॉडेलच्या किंमती दीड लाखांच्या घरात पोहचल्या आहेत. मे महिन्यातील किंमतीच्या तुलनेत जून महिन्यात 18% पर्यंत जास्त रक्कम मोजावी लागत आहे. 

47 टक्क्यांनी मागणी घटली 

जून महिन्यातील आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार सरकारच्या वाहन पोर्टलवर फक्त 35,461 गाड्यांची नोंदणी झाली आहे. दरदिवशी सरासरी 1,363 गाड्यांची नोंदणी होते. त्यानुसार पुढील चार दिवसांत एकूण नोंदणीची आकडेवारी 40,000 हजारपर्यंत जाऊ शकते. मागील 5 महिन्यात सरासरी 77,728 गाड्या विकल्या गेल्या होत्या. त्यामुळे जूनमध्ये तब्बल 47 टक्क्यांनी विक्री खाली येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मे महिन्यात प्रतिदिन 3391 गाड्यांची विक्री होत होती. ती जूनमध्ये 1363 वर आली आहे. मागणी कमी झाल्याने दुचाकी कार निर्मिती उद्योगही अडचणीत आले आहेत. सरकारी अनुदानावर दीर्घकाळ अवलंबून राहता येणार नाही. इव्ही क्षेत्रातील कंपन्यांना स्वत:  सक्षम व्हावे लागेल, असे सबसिडी कमी केल्यानंतर एथर कंपनीच्या सीइओने मत व्यक्त केले होते.

इलेक्ट्रिक दुचाकींच्या किंमती

बाइकवाले पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, OLA SI Pro या गाडीची किंमत 1,39,828 पर्यंत आहे. तर एथर 450X gen 3 या गाडीची किंमत 1,44,825 इतकी आहे. TVS iQube गाडीची किंमती 1,31,828 रुपये आहे. इतरही अनेक कंपन्यांची मॉडेल्स ज्यांच्या किंमती 80/90 हजार रुपयांच्या घरात होत्या त्या 1 लाख रुपयापर्यंत पोहचल्या आहेत.