युरोपिअन सेंट्रल बँक (European Central Bank-ECB) ही युरोपमधील जवळपास 20 देशांची प्रमुख केंद्रीय बँक आहे. या बँकेने पुन्हा एकदा सलग आठव्यांदा व्याजदरात वाढ केली. या सततच्या व्याजदर वाढीमुळे युरोपिअन बँकेचे व्याजदर मागील 22 वर्षांच्या इतिहासात सर्वांत वरच्या स्तरावर पोहोचले आहेत. युरोपिअन बँकेचा व्याजदर सध्या 4 टक्क्यांवर पोहोचला आहे.
युरोपिअन सेंट्रल बँकेची गुरूवारी (दि. 15 जून) मिटिंग झाली. या मिटिंगमध्ये ईसीबीने (युरोपिअन सेंट्रल बँक) 25 बेसिस पॉईंटने व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे तो वाढून 4 टक्क्यांवर पोहोचला आहे. हा व्याजदर मागील 22 वर्षांतील सर्वाधिक व्याजदर असल्याचे बोलले जाते. वाढत्या महागाईमुळे ईसीबीने हा निर्णय घेतला आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी ईसीबी अजून पुढे व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. ईसीबीच्या व्याजदरवाढीचा युरोपमधील जवळपास 20 देशांवर परिणाम होणार आहे. युरोपमधील 20 देश युरो या चलनाचा वापर करतात.
ईसीबीने व्याजदराबरोबरच डिपॉझिट फॅसिलिटीच्या रेटमध्ये ही 25 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. डिपॉझिट फॅसिलिटीचा रेट वाढून आता 3.5 टक्के झाला आहे. त्याचबरोबर ईसीबीने मार्जिनल लेंडिंग रेट्समध्येही 25 बेसिस पॉईंटने वाढ केली. तो आता 4.25 टक्के झाला आहे.
जागतिक पातळीवर सुरू असलेल्या जागतिक मंदीचे आणि महागाईचे सावट कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरबीआयनेही सलग दुसऱ्या बैठकीत रेपो दरामध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दुसरीकडे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनेही मागील 15 महिन्यात प्रथमच व्याजदरामध्ये वाढ न करता ते जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच एकीकडे अमेरिका व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेत आहे आणि दुसरीकडे युरोपिअन बँकेने मात्र 25 बेसिस पॉईंटने व्याजदरात वाढ करून मागील 22 वर्षांतील उच्चांक गाठला आहे. यावरून युरोपमधील आर्थिक स्थिती खूपच चिंताजनक असल्याचे दिसून येते.
भारतावर थेट परिणाम होण्याची चिन्हे कमी!
युरोपिअन सेंट्रल बँकेने व्याजदर वाढवल्याचा भारतावर काही परिणाम होऊ शकतो का? असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो. तेव्हा असे दिसून येते की, भारतातील स्थिती आता बऱ्यापैकी आटोक्यात येऊ लागलीआहे. मे महिन्यातील महागाईचा आलेखही बऱ्यापैकी कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे ईसीबीच्या वाढत्या व्याजदराचा भारतावर थेट परिणाम होण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत.