Repo Rate Unchange:रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे रिअल इस्टेट, बिल्डर आणि घराची खरेदी करणाऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. यापूर्वीच आरबीआयने रेपो दरात जवळपास 2.50 टक्क्यांनी वाढ केल्याने होमलोनचे व्याजदर महाग आहेत. पण सध्या आरबीआयने सलग दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे रिअल इस्टेट सेक्टरला बूस्ट मिळण्याची शक्यता आहे.
रेपो रेट जैसे थे!
आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक गुरूवारी (दि. 8 जून) झाली. या बैठकीत आरबीआयने रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्याचा रेपो दर हा 6.50 टक्के एवढाच आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे रिअल इस्टेट सेक्टरला बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे. यामुळे बँकांचे कर्जाचे व्याजदर आहे तेवढेच राहतील. परिणामी जे ग्राहक या निर्णयाची वाट पाहत होते. ते आता नव्याने होमलोन घेऊ शकतात. तसेच पुढील बैठकीत आरबीआय रेपो दर कमी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शक्यतांमुळे घरांची मागणी वाढू शकते.
महागाई दर आटोक्यात
महागाईचा विचार करता सध्याचा महागाई दर हा मागील 18 महिन्यांच्या खालच्या स्तरावर आहे. त्यामुळे आरबीआय आगामी बैठकीत रेपो दर कमी करण्याची शक्यता आहे. क्रेडाईची राष्ट्रीय अध्यक्ष बोमन इरानी यांनी आरबीआयच्या आजच्या निर्णयाचे स्वागत करत यामुळे घरांची मागणी आणि पुरवठा दोन्हीमध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आरबीआयच्या या निर्णयाचा फायदा मार्केटमधील वेगवेगळ्या सेक्टरलासुद्धा मिळणार आहे.
मागील वर्षभरात कर्ज 2 टक्क्यांनी महागले
मागील वर्षभरात आरबीआयने रेपो दरात वेळोवेळी वाढ केल्यामुळे बँकांचे कर्ज 2 ते 2.5 टक्क्यांनी महागले आहे. त्यात बऱ्याच जणांच्या ईएमआयचे हप्ते वाढले आहेत. तर काहींचा कर्जाचा कालावधी वाढला आहे. पण सलग दोन बैठकांमध्ये आरबीआयने रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतल्याने अनेक कर्जदारांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.