अमेरिकेतील वाढती महागाई कमी करण्यासाठी सेंट्रल बँकेने राबवलेली कठोर पतधोरणाची भूमिका आता सौम्य केली आहे. फेडरल रिझर्व्हने मागील 15 महिन्यांत पहिल्यांदाच व्याजदर जैसे थेच ठेवले. मात्र याच वेळी नजीकच्या काळात किमान दोनदा व्याजदर वाढवण्याचे सूतोवाच केले.
फेडरल रिझर्व्हची बुधवारी बैठक झाली. भारतासह जगभरातील महागाई आता हळुहळू कमी होत आहे. त्यामुळे सेंट्रल बँकांनी पतधोरणातील व्याजदर वाढीला विराम दिला आहे. फेडरल रिझर्व्हकडून मागील 10 बैठकांमध्ये व्याज दरवाढ केली होती.
या दरवाढीने कर्जदारांना प्रचंड फटका बसला होता. गृहकर्ज, वाहन कर्ज, क्रेडीट कार्ड् आणि व्यावसायिक कर्जे महागली होती. मॉर्टगेजचा व्याजदर उच्चांकी पातळीवर गेला आहे. त्याशिवाय क्रेडीट कार्ड्चा व्याजदर 20% वर गेला असून तो आजवरचा सर्वाधिक दर आहे.
फेडरल रिझर्व्हचा प्रमुख व्याजदर 5.1% इतका आहे. मागील 16 वर्षातला हा सर्वाधिक व्याजदर आहे. मागील दोन महिन्यात अमेरिकेतील रोजगारात वाढ झाली आहे. त्याशिवाय महागाईचा पारा कमी झाला आहे. त्यामुळे तूर्त फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर 5.1% वर कायम ठेवण्याची घोषणा करण्यात आली.
मे महिन्यात अमेरिकेतील महागाईचा दर प्रचंड प्रमाणात घसरला आहे. अमेरिकेतील महागाई दर मे महिन्यात 4% इतका खाली आला. त्याआधी जून 2022 मध्ये तो 9.1% वर गेला होता. मे महिन्यात अमेरिकेतील कोअर महागाईचा दर 5.3% इतका आहे.
रशिया-युक्रेनमुळे अमेरिका आणि युरोपात इंधन आणि ऊर्जेच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. या दोन मुख्य कारणांमुळे या ठिकाणी महागाईचा भडका उडाला होता. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अद्याप शमलेले नाही.त्यामुळे महागाईचा पारा आणखी वाढेल, अशी शक्यता फेडरल रिझर्व्हच्या बोर्डातील संचालकांनी व्यक्त केली आहे.
फेडरल रिझर्व्हने आता भूमिका सौम्य केली असली तरी चालू वर्षात व्याजदरात किमान दोनदा वाढ केली जाण्याची शक्यता आहे. बँकेकडून प्रमुख व्याजदर 5.6% इतका वाढवला जाईल, अशी शक्यता बँकिंग तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.