Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Loan Process: गृह कर्ज घेताना काय पूर्वतयारी करावी?

Essential Prerequisites for Applying for a Home Loan

Home Loan Process: घरासाठी कर्ज घेताना कोणत्या प्रकारच्या कर्जाची निवड करावी. होम लोन म्हणजे काय किंवा कोणत्या बॅंका होम लोन देतात.त्यांचे व्याजदर काय? आणि वैयक्तिक कर्ज घेताना बॅंकांची प्रक्रिया काय असते. अशा सर्व प्रकारची बेसिक माहिती असणे गरजेचे आहे.

Home Loan Process: स्वत:चे घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण आजच्या काळात गेलो बिल्डरकडे किंवा घर मालकाकडे आणि घेतलं घर विकत, असे होत नाही. घर विकत घेणं ही काहीच्या दृष्टीने खूपच मोठी गोष्ट आहे. कारण घरांच्या वाढत्या किमती, वाढती महागाई आणि त्यातून मिळणारे उत्पन्न हे पाहता घर विकत घेण्यासाठी कर्ज हे घ्यावंच लागतं. मग कर्ज घेताना आपली मिळकत किती? बॅंकेकडून किती कर्ज मिळू शकते? तसेच आपण पाहत असलेल्या घराची किंमत किती? हे तपासणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी काही गोष्टींची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे.

घरासाठी कर्ज घेताना कोणत्या प्रकारच्या कर्जाची निवड करावी. होम लोन म्हणजे काय किंवा कोणत्या बॅंका होम लोन देतात आणि वैयक्तिक कर्ज घेताना बॅंकांची प्रक्रिया काय असते. याची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे.

Table of contents [Show]

गृह कर्ज म्हणजे काय? (What is Home Loan?)

होम लोन ही अशी रक्कम आहे; जी बॅंका, कर्ज देणाऱ्या कंपन्या, हाऊसिंग फायनान्स कंपन्या किंवा नॉन-बॅंकिंग वित्तीय संस्था या नवीन किंवा जुने घर विकत घेण्यासाठी, घराचे नुतनीकरण करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देतात. ही रक्कम कर्ज म्हणून घेणाऱ्या व्यक्तीला त्यावर विशिष्ट व्याजदर भरावा लागतो. तसेच ही मुद्दल रक्कम आणि व्याजासह ईएमआयने एका ठराविक कालावधीत फेडावी लागते.

भारतात गृह कर्जाचे कोणते प्रकार उपलब्ध आहेत? (Types of Home Loan)

भारतात आर्थिक संस्थांच्या नियमानुसार वेगवेगळ्या ग्राहकांनुसार होम लोनचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत.

होम लोन (Home Loan)

होम लोन हा बहुतांश बॅंकांमध्ये उपलब्ध असलेला आणि अगदी सर्वमान्य असा कर्जचा प्रकार आहे. नावानुसारच या होम लोनच्या माध्यमातून नवीन घर, रो हाऊस किंवा बंगला किंवा इमारतीमध्ये बांधल्या जाणऱ्या नवीन घरासाठी बॅंका काही नियमांच्या अधिन राहून पैसे उपलब्ध करून देतात. या प्रकारच्या लोनचा किंवा कर्जाचा वापर करून तयार घर किंवा बांधकाम सुरू असलेली प्रॉपर्टी विकत घेता येऊ शकते.

होम कन्स्ट्रक्शन लोन (Home Construction)

जर एखाद्या व्यक्तीकडे स्वत:चा मोकळा प्लॉट आहे; आणि त्या प्लॉटवर घर उभारण्यासाठी त्याला पैशांची गरज भासत असेल. तर ती गरज होम कन्सट्रक्शन लोनद्वारे बॅंका किंवा नॉन-बॅंकिंगद्वारे  पूर्ण करता येऊ शकते.

हाऊस रिनोव्हेशन लोन (House Renovation Loan)

जर एखाद्या व्यक्तीकडे स्वत:चे घर आहे; आणि त्याला त्याचे नुतनीकरण करायचे असेल तर ती व्यक्ती घर नुतनीकरणासाठी बॅंक किंवा हाऊसिंग फायनान्स कंपन्यांकडून कर्ज मागू शकते.

हाऊस एक्सटेन्शन लोन (House Extension Loan)

पूर्वीपासून तयार असलेल्या घरामध्ये वाढ करायची असल्यास किंवा त्यामध्ये इतर बदल करायचे असल्यास जसे की, नवीन माजघर, किचन, अजून एखादे बाथरूम किंवा अतिरिक्त बेडरूम वाढवायचा असेल तर बॅंकेकडून होम एक्सटेन्शन लोन दिले जाते.

प्लॉट लोन (Plot Loan)

जर तुम्हाला एक मोकळी जागा विकत घेऊन त्यावर इमारत बांधायची असेल तर बॅंकेकडून प्लॉट लोन दिले जाते.

बॅलन्स ट्रान्सफर लोन (Balance Transfer Loan)

हाऊसिंग फायनान्स कंपन्या या बॅलन्स ट्रान्सफर लोनची विशेष ऑफर देतात.  बॅलन्स ट्रान्सफर लोन म्हणजे एका बॅंकेतून घेतलेले लोन दुसऱ्या बॅंकेकडे ट्रान्सफर केले जाते. बऱ्याच वेळा दुसऱ्या बॅंका कमी व्याजदर आकारत असल्यामुळे बॅलन्स ट्रान्सफर लोनचा पर्याय वापरला जातो.

गृह कर्जासाठी पात्रता काय आहे? (Eligibility for Home Loan)

वय आणि लोन परतफेड करण्याचा कालावधी (Age & Tenure)

बॅंका होम लोन देताना कर्जदाराचे वय पाहते. जितके वय कमी असेल तितके होम लोन मिळण्याची शक्यता जास्त असते. तसेच वय लहान असते तेव्हा दीर्घ कालावधीसाठी लोन मिळते.

कर्जदाराची आर्थिक स्थिती (Financial Conditions)

बॅंक कर्ज देताना कर्जदाराची आर्थिक स्थिती तपासते. जेणेकरून कर्ज घेणारी व्यक्ती कर्ज कसे फेडणार. त्याला नोकरी आहे की, स्वत:चा व्यवसाय आहे.ज्यातून त्याला नियमित उत्पन्न मिळते, हे बॅंकेकडून तपासले जाते.  

क्रेडिट स्कोअर (Credit Score)

तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल आणि तुम्ही वेळोवेळी बिले भरत असाल. तर तुमची कर्ज मिळण्याची शक्यता जास्त आहे.

इतर आर्थिक दायित्वं (Other Financial Liabilities)

कर्जदाराने होम लोन व्यतिरिक्त इतर कुठल्या प्रकारची कर्जे घेतली आहेत का? ती कर्जे वेळेवर फेडली आहेत का, हे बॅंकेकडून आवर्जून पाहिले जाते. यावर बॅंक कर्जदाराची आर्थिक पत तपासत असते.

प्री-अ‍ॅप्रूव्ह होम लोन म्हणजे काय?

प्री-अ‍ॅप्रू्व्ह होम लोन म्हणजे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न तपासून, कागदपत्रांची पडताळणी करून त्याला एखाद्या ठराविक रकमेपर्यंत कर्ज मिळू शकते. तसेच त्यासाठी व्याजदर किती आकारला जाईल आणि त्या व्यक्तीला ईएमआय किती बसेल. यादृष्टीने बॅंक कर्जदाराला ठराविक मुदतीसाठी प्री-अ‍ॅप्रूव्ह होम लोन मंजूर करते. या प्री-अ‍ॅप्रूव्ह होम लोनच्या आधारावर कर्ज घेणारी व्यक्ती त्या रेंजनुसार घर खरेदी करण्याचा विचार करते.

होम लोनसाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतात?

होम लोन घेताना किमान किंवा त्यासाठी बॅंकेत अर्ज करताना किमान कागदपत्रे लागतात. ती नेमकी कोणती असतात. ते आपण पाहुया.

  • गृह कर्ज घेण्यासाठी बॅंकेच्या नावाने अर्ज
  • 3 पासपोर्ट आकाराचे फोटो
  • ओळखपत्र (पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र)
  • निवासाचा पुरावा (विजेचे बिल, रेशन कार्ड, टेलिफोन बिल, बॅंक पासबुक)
  • बॅंकेचे लेटेस्ट स्टेमेंट किंवा अपडेट पासबुक
  • खरेदी करणाऱ्या प्रॉपर्टीचे कागदपत्रे
  • 3 वर्षाचे सॅलरी सर्टिफिकेट (नोकरदार व्यक्तींसाठी)
  • मागील 2 वर्षांचे आयटी रिटर्न्स (नोकरदार व्यक्तींसाठी)
  • व्यवसायाचा पुरावा (व्यावसायिकांसाठी)

होम लोनच्या अर्जासोबत केवायसीसाठी लागणारी कागदपत्रे

फोटो ओळखपत्र (खालीलपैकी 1)

  • पासपोर्ट
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदार ओळखपत्र

निवासी पुरावा (खालीलपैकी 1)

  • विजेचे बिल
  • रेशन कार्ड
  • टेलिफोन बिल
  • नोकरीचे पत्र
  • बॅंकेचे पासबुक किंवा बॅंक स्टेटमेंट

वयाचा पुरावा (खालीलपैकी 1)

  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट
  • जन्मदाखला
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • बॅंक पासबुक
  • दहावीचे मार्कशीट

अशाप्रकारे कागदपत्रांची पूर्तता किंवा जमवाजमव करून तुम्ही बॅंकेच्या प्रतिनिधींशी बोलू शकता किंवा अधिकची माहिती मिळवू शकतो. प्रत्येक प्रकारच्या कर्जाचे व्याजदर हे वेगवेगळे असतात. तसेच बॅंकानुसारही त्यात बदल होऊ शकतो. त्यामुळे या मूलभूत माहितीच्या आधारे तुम्हाला चांगला व्याजदर देणाऱ्या बॅंकेकडून गृह कर्ज घेऊ शकता.