कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) जुलै महिन्यात तब्बल 18.75 लाख खातेदार जोडून एक उच्चांक गाठला आहे. EPFO बुधवारी जाहीर झालेल्या पेरोल डेटामध्ये ही माहिती समोर आली आहे. 2018 पासून EPFO पेरोल डेटा प्रकाशित करते त्याननुसार 2023 मधील खातेदार वाढीची ही संख्या सर्वोच्च आहे. तसेच खातेदारांची ही संख्या जून 2023 च्या तुलनेत सुमारे 85,932 ने वाढली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून यामध्ये महाराष्ट्रातील खातेदारांची संख्या अव्वल स्थानी आहे.
जुलैमध्ये 10.27 लाख खातेदारांची नोंद
EPFO च्या डेटानुसार जुलै, 2023 मध्ये जवळपास 10.27 लाख नवीन सदस्यांनी नोंदणी केली आहे. ही आकडेवारी गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. EPFO मध्ये समाविष्ट होणारे बहुतांश नवीन खातेदार हे 18-25 वर्षे वयोगटातील आहेत. तसेच 2023 मध्ये जवळपास 3.86 लाख महिला सदस्यांची खाती सुरू झाली आहेत. तसेच EPFO खातेदारांच्या एकूण आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात तब्बल 12.73 लाख खातेदारांनी आपल्या नोकऱ्या बदलल्याचे या अहवालात म्हटले आहे.
महाराष्ट्राचा वाटा अव्वल-
EPFO या पेरोल डेटानुसार नवीन खातेदार नोंदणीमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि हरियाणा या 5 राज्यांमध्ये निव्वळ सदस्यसंख्या सर्वाधिक आहे. एकूण सदस्यांपैकी 58.78 टक्के खातेदार सदस्य हे या 5 राज्यातील आहेत. तर 5 मध्ये राज्यातून महाराष्ट्रातील सदस्यांची संख्या ही सर्वाधिक म्हणजे 20.45% इतकी आहे. दरम्यान या एकूण 5 राज्यात जुलै 2023 मध्ये एकूण 11.02 लाख सदस्यांच्या नोंदणीची भर पडली आहे.