4.50 कोटींहून अधिक लोक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी (Employees Provident Fund Organization) संबंधित आहेत. नोकरी करणाऱ्या लोकांचा पीएफ कापला जातो. पीएफ खात्यात जमा केलेले पैसे हे भविष्यातील सर्वात मोठे भांडवल आहे. भविष्य सुरक्षित करण्याव्यतिरिक्त, पीएफ 7 लाख रुपयांच्या विम्याचा लाभ देखील विनामूल्य देतो. ईपीएफओ (EPFO) चे सर्व सब्सक्राइबर (सदस्य) एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड् इन्शुरन्स स्कीम (EDLI) 1976 अंतर्गत कव्हर होतात. अशा परिस्थितीत, नोकरीदरम्यान एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनीला या योजनेअंतर्गत 7 लाखांपर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते.
EDLI योजनेंतर्गत मिळणारी विमा रक्कम मागील 12 महिन्यांच्या पगारावर अवलंबून असते. दरमहा, कर्मचार्यांच्या पगारातून जमा केलेल्या पीएफच्या रकमेपैकी 8.33 टक्के रक्कम ईपीएसमध्ये, 3.67 टक्के ईपीएफमध्ये आणि 0.5 टक्के रक्कम ईडीएलआय योजनेत जमा केली जाते. कर्मचाऱ्याचा आजार, अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास विमा संरक्षण दिले जाऊ शकते.
एकरकमी पैसे मिळणार
कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर, विमा रक्कम सब्सक्राइबरने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीकडे जाते. नॉमिनी विम्याच्या रकमेसाठी दावा करतो आणि त्याला हे पैसे एकाच वेळी मिळतात. जर कोणाला नॉमिनी नसेल, तर कायदेशीर वारसांना विम्याची रक्कम समान मिळते.
नोकरी सोडल्यास फायदा मिळत नाही
EDLI योजनेअंतर्गत, कोणताही खातेदार किमान रु. 2.5 लाख आणि कमाल रु. 7 लाखांचा विमा दावा मिळवू शकतो. किमान दावा मिळविण्यासाठी खातेधारकाला किमान 12 महिने नोकरी असणे आवश्यक असते. नोकरी सोडणाऱ्या खातेदाराला विम्याचा लाभ दिला जात नाही.
नॉमिनेशन जरूर करा
ईपीएफओ सब्सक्राइबर्सनी त्यांच्या खात्यात नॉमिनीचे नाव नोंदवणे आवश्यक आहे. खात्यात नॉमिनी असण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ईपीएफ, ईपीएस आणि ईडीएलआय योजनांचा लाभ घेण्यास कोणतीही अडचण येत नाही. दुसरीकडे, जर नामनिर्देशित व्यक्तीचे नाव कोणत्याही खात्यात जोडले गेले नाही, तर अशा परिस्थितीत खातेदाराच्या सर्व कायदेशीर वारसांना पैसे मिळविण्यासाठी बरीच कागदपत्रे करावी लागतात. यामुळे क्लेम मिळण्यास वेळ लागतो.