EPFO Grievance Redressal: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) कार्यालयाकडे जर तुम्ही काही तक्रार केली असेल आणि त्यास उशीर होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तक्रारी निकाली काढण्यासाठी जास्त उशीर होत असल्याचे म्हणत EPFO कार्यालयाने विभागीय कार्यालयांना कठोर शब्दांत सुनावले आहे. खातेदारांच्या तक्रारी 7 दिवसांच्या आत सोडवण्याचे आदेश कार्यालयांना दिले आहेत.
खातेदारांच्या तक्रारी प्रलंबित
मागील काही दिवसांपासून EPFO कार्यालयात अनेक तक्रारी प्रलंबित पडल्या आहेत. तसेच या तक्रारी निवारणासाठीचा सरासरी वेळ वाढला आहे. त्यामुळे कामगार मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे चांगलेच कान टोचले. त्यानंतर EPFO कार्यालयाने सर्व विभागीय कार्यालयांना तक्रारी सात दिवसांच्या आत सोडवण्याचे निर्देश दिले आहेत.
EPFO कार्यालयाच्या 2022 मधील आदेशानुसार 15 दिवसांच्या आत खातेदारांच्या तक्रारी सोडवणे अनिवार्य आहे. मात्र, तरीही तक्रारी सोडवण्यास उशीर होत आहे. अनेक प्रकरणांमध्ये महिना उलटूनही जात असल्याने कामगार मंत्रालयाने या प्रकरणात लक्ष घातले आहे. ईपीएफओ ही एक सार्वजनिक संस्था आहे. खातेदारांच्या अडचणी सोडवण्यातील उशीर झाल्याने विभागाची प्रतिमा मलिन होते, असे ईपीएफओने म्हटले आहे.
तक्रार निवारणास उशीर झाल्यास जबाबदार कोण?
ज्या तक्रारी सोडवण्यास 30 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागेल अशा प्रकरणांची जबाबदारी विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची असेल. तसेच विभागीय कार्यालयांमध्ये प्रलंबित असणाऱ्या तक्रारींची माहिती मुख्य कार्यालयाला वेळेवर पाठवत जा, असेही म्हटले आहे. 2022-23 आर्थिक वर्षात ईपीएफओ च्या विभागीय कार्यालयाकडे सरासरी 10 ते 12 हजार तक्रारी दाखल होत्या. इपीएफओची एकूण 135 विभागीय कार्यालये आहेत. तसेच मुंबई, दिल्ली, बंगळुरू अशा बड्या शहरांमधील कार्यलयातील तक्रारींचा आकडा यापेक्षा जास्त असू शकतो.
मागील महिन्यात ऑनलाइन पासबुक सुविधा बंद
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे भारतात सुमारे 7 कोटी सभासद आहेत. ईपीएफओच्या बहुतेक सुविधा ऑनलाइन आहेत. एप्रिल महिन्यात EPFO ची पासबुक डाऊनलोड सुविधा आठवडाभर बंद होती. या काळात खातेदारांना पासबुक संबंधित कोणतीही कामे करता येत नव्हती. तसेच इतर तक्रारीही त्यामुळे खोळंबून पडल्या होत्या.