Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Engineering books in Marathi: इंजिनिअरिंगची पुस्तकं मराठीतून उपलब्ध; भाषांतरामागचं अर्थकारण जाणून घ्या?

Engineering books in Marathi

इंजिनिअरिंगचे विषय मातृभाषेतून समजून घेणे विद्यार्थ्यांसाठी सोपे झाले आहे. AICTE ने मराठी सह 12 भाषांतून इंजिनिअरिंग आणि डिप्लोमाची पुस्तके मराठीतून उपलब्ध केली आहेत. मात्र, या पुस्तकांच्या किंमती जास्त असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यामागे भाषांतराचे मोठे अर्थकारण आहे. पुस्तके स्थानिक भाषेत भाषांतरित करणे, पुन्हा तपासून घेणे यासाठी जास्त खर्च येतो. त्यामुळे पुस्तकांच्या किंमती वाढत आहेत.

Engineering books in Marathi: इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स सारखे टेक्निकल विषय पूर्वीपासून इंग्रजी माध्यमातून देशभरातील विविध विद्यापीठे आणि कॉलेजातून शिकवले जातात.  मात्र, 2020 साली केंद्र सरकारने आणलेल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमुळे हे चित्र पालटत आहे. 

डिप्लोमा आणि पदवी स्तरावरील विविध टेक्निकल कोर्सेसची पुस्तके आता भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होत आहेत. ऑल इंडिया टेक्निकल एज्युकेशन कौन्सिलकडून (AICTE) अभ्यासक्रमातील पुस्तके स्थानिक भाषांमध्ये भाषांतरीत करण्यात आली आहेत. तसेच ही पुस्तके AICTE च्या eKUMBH Portal वर विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध आहेत. मात्र, ही पुस्तके स्थानिक भाषेत आणत असताना यामागे मोठे अर्थकारण आहे. 

इंग्रजीमधून अभ्यासक्रमाची पुस्तके समजण्यास विद्यार्थ्यांना अडचणी येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील, विश्लेषणात्मक आणि तार्किक विचार करण्यासाठी क्षमता विकसित होत नाही. माध्यमिक शिक्षण स्थानिक भाषांतून झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी, डिप्लोमाचे शिक्षण घेताना अडचणींचा सामना करावा लागतो. आता मराठीतूनही विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर शाखेचे विविध कोर्सेस मराठीतून शिकता येतील. मात्र, पुस्तके भाषांतरीत करताना यामध्ये अनेक आव्हाने आहेत.

engineering-books-in-marathi.jpg

इमेज सोर्स - ekumbh.aicte-india.org

2022 मध्ये नोव्हेंबर महिन्यापासून AICTE ने पुस्तके भाषांतरित करण्याचा प्रकल्प सुरू केला. सर्वप्रथम ही पुस्तके इंग्रजी भाषेत नव्याने लिहून घेण्यात येत आहेत. त्यानंतर भाषांतरासाठी त्या त्या राज्यातील विद्यापीठांकडे सोपवण्यात येत आहेत. अभ्यासक्रमात कोणतीही चूक होऊ नये, तसेच क्लिष्ट संकल्पना नीटपणे विद्यार्थ्यांना समजाव्यात याची दक्षता घेतली जात आहे. तसेच भाषांतरित केलेल्या पुस्तकांचे पुनरावलोकनही करून घेतले जात आहे. https://ekumbh.aicte-india.org/ या पोर्टलवर तुम्हाला इंजिनिअरिंगची मराठीसह इतर भाषेतील पुस्तके मोफत डाउनलोड करता येतील.

भाषांतराचा खर्च (Cost of engineering Book Translation)

स्थानिक भाषांमधून पुस्तके भाषांतरित करताना मोठा खर्च होत असण्याची शक्यता आहे. कदाचित त्यामुळेच पुस्तकांच्या किंमती आवाक्याबाहेर असल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. हार्डकॉपी पुस्तके महाग असल्याचे विद्यार्थ्यांनी काही माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र, आता AICTE ने मोफत ऑनलाइन पुस्तके उपलब्ध केल्यामुळे विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कारण, पुस्तक विकत न घेता PDF कॉपी eKUMBH Portal वरुन डाऊनलोड करून वाचता येईल.

स्थानिक भाषेतून पुस्तकांचा निर्णय स्वागतार्ह

‘महामनी’ने ज्येष्ठ भाषांतरकार अरुण गोरे यांच्याशी संवाद साधला. ‘महामनी’शी बोलतना ते म्हणाले की, “मराठी भाषेतून इंजिनिअरिंगची पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली; हा निर्णय स्वागतार्ह आहे. परदेशात चिनी, जपानी, कोरियन भाषांतून शिक्षण दिले जाते. तसेच त्या भाषेमध्येच काम चालते. त्या देशातील जनता इंग्रजीच्या मागे जात नाही. त्यामुळे भारतीय भाषांमध्ये उच्च शिक्षण देण्यात काहीच अडचण नाही. तांत्रिक विषयांचे क्लिष्ट भाषांतराचे काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळ देशात उपलब्ध आहे. स्थानिक भाषेतील पुस्तकांच्या किंमती आवाक्यात राहतील, असेही त्यांनी म्हटले.

मराठीतून परीक्षा घेण्यास परवानगी नाही

तंत्रशिक्षण विभागाने अभ्यासक्रम मराठीमध्ये आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र, परीक्षा अद्यापही फक्त इंग्रजी भाषेतूनच उपलब्ध आहेत. म्हणजे इंजिनिअरिंगचा अभ्यास तुम्ही मराठीत किंवा इतर स्थानिक भाषेत करू शकता. मात्र, परीक्षा तुम्हाला इंग्रजीतूनच द्यावी लागेल. जर परीक्षाही स्थानिक भाषेतून घेण्याचा निर्णय झाला तर प्रश्नपत्रिका भाषांतराचा खर्च वाढेल. तसेच प्रश्नपत्रिका स्थानिक भाषेतून काढण्यासाठी कुशल मराठी भाषांतरकारही लागतील. त्यासाठी होणार खर्च जास्त असू शकतो.

PCCOE कॉलेजमध्ये मराठी अभ्यासक्रमाचा पहिला प्रयोग

पुण्यातील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (PCCOE) मध्ये मराठी भाषेतून अभियांत्रिकी पदवी उपलब्ध आहे. महामनीने मराठी अभ्यासक्रमाच्या माहितीसाठी PCCOE कॉलेजशी संपर्क साधला. "पदवीच्या पहिल्या दोन वर्षांसाठी मराठीतून अभ्यासक्रम उपलब्ध असेल त्यानंतरची दोन वर्ष अभ्यासक्रम इंग्रजीतून असेल. स्थानिक भाषेतील कोर्सेसला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद आहे. ज्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी कमकुवत आहे त्यांचा ओढा मराठीमधून शिकण्याकडे आहे. तसेच मराठी आणि इंग्रजी असे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत", असे कॉलेज प्रशासनाने सांगितले.