निवृत्तीनंतर काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. निवृत्तीनंतर एकप्रकारे आयुष्यातील दुसरी इनिंग सुरू होत असते. या टप्प्यातही अनेकजण उत्पन्नाच्या मागे धावतात, तर काहीजण इतर मार्ग निवडतात. काहीजण प्रवास करतात, तर काहीजण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी काम करतात. निवृत्तीनंतर उत्पन्नाव्यतिरिक्त वैयक्तिक व भावनिकतेच्या दृष्टीकोनातून काय करू शकता? याविषयी या लेखातून जाणून घेऊयात.
उत्पन्नाचा मार्ग
प्रत्येकानेच निवृत्तीनंतरचे आयुष्य जगण्यासाठी बचत केलेली असेल असे नाही. निवृत्तीनंतर पगारातून येणारा पैसा थांबतो. यामुळे अनेकजण पार्ट टाईम नोकरी अथवा उत्पन्नाचा मार्ग शोधतात. काहीजण निवृत्तीनंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याला प्राधान्य देतात.
मात्र, अनेकजण आयुष्यातील या दुसऱ्या इनिंगमध्ये आर्थिक उत्पन्नापलिकडे जाऊन इतर मार्ग निवडताना पाहायला मिळतात. निवृत्तीनंतर रिकामेपणा जाणवत असल्याने मानसिक व शारिरिक आरोग्याच्या दृष्टीने स्वतःला इतर कामांमध्ये गुंतवून ठेवणे गरजेचे आहे.
निवृत्तीनंतरची दुसरी इनिंग
प्रवास करा | नोकरीमुळे प्रवासाच्या संधी मिळत नाही. निवृत्तीनंतर मोकळा वेळ असल्याने प्रवासाचे स्वप्न पूर्ण करू शकता. |
एनजीओच्या माध्यमातून समाजासाठी काम | निवृत्तीनंतर काहीजण आर्थिक फायद्याच्या पलिकडे जाऊन समाजासाठी काम करतात. यामुळे समाजासाठी काहीतरी केल्याचा आनंद तर मिळतोच, सोबतच हे काम करताना इतरांशी निर्माण झालेल्या मैत्रिपूर्ण नातेसंबंधांमुळे सौहार्द आणि आपुलकीची भावना निर्माण होऊ शकते. तसेच, अनेक वर्षांच्या कामाच्या अनुभवाचा उपयोग तरुण व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यासाठी करू शकता. |
नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न | निवृत्तीनंतरच्या दुसऱ्या इनिंगमध्ये नवीन काहीतरी करणे आव्हानात्मक ठरू शकते. मात्र, वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी अनेक चांगल्या संधी देखील मिळतात. या काळात उत्पन्नाच्या मागे न धावता तुम्ही नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करू शकता. नवीन क्षेत्रांबाबत जाणून घेऊ शकता. याचा वैयक्तिरित्या फायदा होऊ शकतो. |
आरोग्याकडे द्या लक्ष | अनेकदा आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र, वयाची 60-70 वर्ष पूर्ण केल्यानंतर आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही निवृत्तीनंतर स्वतःच्या मानसिक व शारिरिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. निवृत्तीनंतर तुम्हाला आनंद देणारे काम केल्यास याचा आरोग्यावरही सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. |
थोडक्यात, निवृत्तीनंतरची दुसरी इनिंग सुरू करताना काय करायला हवे हे ठरवणे गरजेचे आहे. या दिवसांमध्ये आर्थिक फायद्याच्या पलिकडे जाऊन स्वतःची आवड जोपासण्यासाठी वेळ द्यायला हवा. तसेच, अर्थपूर्ण कार्य करून समाजासाठी काहीतरी योगदान देऊ शकता.